मोदींचा राष्ट्रीय पर्याय?

modi1
नितीशकुमार हे नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे येतील असे निदान बरेच पत्रपंडित करायला लागले आहेत. मात्र या अंदाजातील विश फुल थिंकिंगचा भाग सोडला तर नितीशकुमार यांच्यात ती ताकद असल्याचे फार अभावानेच दिसते. ते येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी ज्या नेत्यांना निमंत्रणे पाठवली आहेत त्यांच्या नावातूनच नितीशकुमार यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेलाही त्यांनी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचे नेते हे निमंत्रण आल्यापासून आनंदाने नाचायला लागले आहेत. कारण या शपथविधीच्या निमित्ताने भाजपाच्या विरोधातल्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने केलेल्या आपल्या पाणउतार्‍याला उत्तर देण्याची एक संधी आपल्याला मिळणार आहे असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटायला लागले आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठी आघाडी तयारच झाली आहे असे या सर्वांना वाटायला लागले आहे. म्हणून नितीशकुमार यांनी कोणाकोणाला निमंत्रणे दिली आहेत याच्या तपशीलवार बातम्या काही माध्यमांत झळकायला लागल्या आहेत.

खरे तर याआधी अनेक राज्यांत अशी सत्तांतरे झाली आहेत पण आताच्या बिहारच्याच निवडणुकीच्या निकालानंतरच एवढा भांगडा का केला जात आहे? यामागचे कारण आहेत मोदी. त्यांनी आता देशाचा आर्थिक कार्यक्रम अशा काही झपाट्याने पुढे सरकवायला सुरूवात केली आहे की त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याची फळे दिसायला लागणार आहेत. परदेशी गुंतवणुकीला आकृष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रत्यक्षात उतरणार तर आहेतच पण सत्तेवर आल्यापासून जाहीर केलेल्या योजनाही लोकांचे डोळे दिपवून टाकत आहेत. जनधन योजनेपासून ते स्मार्ट सिटी योजनेपर्यंतच्या मोदी सरकारच्या योजना पाहिल्या तर मोदी आपल्याला बेदख़ल करतील अशी भीती सर्वांनाच वाटायला लागली आहे. कॉंग्रेसचे तर धाबे दणाणले आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या भवितव्याची चिंता सतावयाला लागली होती त्यांनी टिकून राहण्याच्या निकडीच्या गरजेपोटी बिहारात एकत्रीकरण केले. मोदी यांचा चढेलपणा हा या सर्वांनी मोठा विषय केला खरा पण तो चढेलपणा नसून आपण या देशाचे चित्र बदलून टाकणारच असा आत्मविश्‍वास आहे. मात्र त्याविषयी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यात मोदी विरोधकांना यश आले. अन्य काही घटक कारणीभूत ठरून तिथे मोदींचा पराभव झाला पण या निकालाने नितीशकुमार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते म्हणून चमकणार असे जे चित्र निर्माण करण्यात येत आहे ते अतिशयोक्तीपूर्ण आहे कारण या देशातले समाजवादी कधी स्वत: एकीने नांदलेले नाहीत आणि इतरांनाही एकत्र करू शकलेले नाहीत.

नितीशकुमार यांना मोदींचा पर्याय म्हणून उभे करण्याआधी त्यांना आपल्या बिछडलेल्या समाजवादी साथींना एकत्र आणावे लागेल. भाजपात लालकृष्ण अडवाणी यांना अडगळीला टाकले म्हणून काही समाजवादी नकली अश्रू ढाळत आहेत पण त्यांना या क्षणी जॉर्ज फर्नांडिस हे नाव आठवत नाही. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस हे आधी समता पार्टीत होते. पण नितीशकुमार यांनी फर्नांडिस यांंना पद्धतशीरपणे अडगळीत टाकून पक्षावर आपले वर्चस्व निर्माण केले आणि भाजपाशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. लोकांना समाजवादी साथींचा फार जुना इतिहास सांगण्याची गरज नाही पण नितीशकुमार, लालू प्रसाद, पासवान, मुलायमसिंग यादव हे सारे समाजवादी नेते जनता दलात एकत्र होते आणि व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रात स्थापन झालेल्या सरकारचे भाग होते. आता हे सारे समाजवादी काय करीत आहेत ? कोठे आहेत आणि कोणाशी युती करून सत्ता उपभोगत आहेत याचा शोध घ्यावा लागेल. मोदींना पर्याय उभा करण्यापूर्वी नितीशकुमार यांना आधी या सगळ्या साथींना हाकारावे लागेल.

नंतर त्यांना पूर्वीच्या लोकदलातल्या काही सहकार्‍यांना एकत्र करून १९९० नंतर शकले झालेली जनता दलाची गोधडी नीट शिवावी लागेल. जनता दलाची तर राज्यनिहाय एकेक अशी कितीतरी शकले झाली आहेत. त्यातल्या लालू प्रसाद यांना भ्रष्टाचाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा फर्मावली आहे तर ओेमप्रकाश चौताला हे तुरूंगात आहेत. मुलायमसिंग यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. (त्यात आता शरद पवार या आघाडीला बळ देण्यासाठी नटायला लागले आहेत). कर्नाटकात देवेगौडा, उत्तर प्रदेशात अजितसिंग, ओरिसात नवीन पटनाईक असे तुकडे पडलेले आहेत. राज्यनिहाय एकेक तुकडा पडला असता तरी परवडले असते पण कर्नाटकात आणि ओरिसात माजी जनता दलीयांचे तीन तीन गट आहेत. या सगळ्या खिचडीला कॉंग्रेसची फोडणी देऊन राष्ट्रीय पर्याय निर्माण करण्याच्या वल्गना या लोकांनी सुरू केल्या आहेत पण या सगळ्यांचा एकदिलाने नांदण्याचा मुळी इतिहासच नाही. आताही नितीशकुमार यांच्या शपथविधीला अडवाणी यांना निमंत्रण द्यावे की नाही यावरून वाद सुरू झाला आहे. नितीशकुमार यांना अडवाणी हवे आहेत पण लालूप्रसाद आणि राहुल गांधी यांना ते नको आहेत. यावरून वाद झाला आणि नितीशकुमार यांना झुकावे लागले. ही तर शपथविधीपूर्वीची स्थिती आहे. ते प्रत्यक्षात कामाला सुरूवात करतील तेव्हा काय काय होईल हे आताच सांगता येत नाही पण लालू प्रसादांशी संघर्ष व्हायला लागेल तेव्हा त्यांना मोदींचा पर्याय होण्याच्या स्वप्नांच्या ठिकर्‍या होताना पहाव्या लागतील.