
अमेरिकन नॅचरल हिस्ट्री संग्रहालयातील एक पक्षी संशोधक ख्रिस्तोफर फिलार्डी यांनी सुमारे दोन दशकापासून अदृश्य असलेल्या प्रजातीचा एक नर पक्षी अथक प्रयत्नांनी शोधून काढला. मात्र तो सापडल्याचा आनंद व्यक्त करतानाच त्यांनी पुढील संशोधनासाठी म्हणून त्या नजरबंदी करणाऱ्या पक्षाची हत्या केली. या हत्येवरून आता संशोधकांमध्येच वादाचे वादळ निर्माण झाले आहे.
निसर्गाच्या अद्भूत आविष्काराचा शोध आणि अंत
मुस्टॅच्ड किंगफिशर या प्रजातीचे पक्षी सुमारे ५० वर्षापासून अदृश्य झाले होते. सन १९२० मध्ये या प्रजातीची एक मादी प्रथम आढळून आली. त्यानंतर थेट सन १९५० मध्ये स्थानिक शिकाऱ्यांनी आणखी दोन मादी पक्षी संशोधकांकडे सोपविले. त्यानंतर हे पक्षी कधीच कोणाला आढळले नाही. तोपर्यंत सापडलेल्या पक्षांमध्ये एकाही नराचा समावेश नव्हता.
फिलार्डी आणि त्यांचे संशोधकाचे पथक सोलोमन आयलॅन्ड मधील ग्वाडालकनाल या दुर्गम भागात गेले असता त्यांना ‘मुस्टॅच्ड किंगफिशर’ प्रजातीचा नर आढळून आला. पूर्ण निळ्या रंगाची पाठ आणि नारिंगी रंगाची तेजस्वी चोच आणि चेहेरा असलेला हा पक्षी खरोखर नजरबंदी करणारा गोंडस पक्षी होता. ‘आजपर्यंत कल्पनेत असलेला निसर्गाचा आविष्कार जिवंतपणे समोर साकारला’; असे उद्गार फिलार्डी यांच्या तोंडून अनाहूतपणे बाहेर पडले. मात्र या निसर्गाच्या आविष्काराला पुढच्याच क्षणी फिलार्डी यांनी नष्ट केले. संशोधकांच्या परिभाषेत याला हत्या नव्हे; तर ‘कलेक्ट’ करणे; असे संबोधले जाते. उपलब्ध असलेल्या प्रजातीच्या नमुन्याचे अभ्यासासाठी बलिदान देऊन पुढच्या जीवांना वाचविण्यासाठी तयारी करणे; असे त्याचे समर्थन केले जाते. मात्र दीर्घ काळानंतर सापडलेल्या आणि पुढे सापडेलच याची शाश्वती नसलेल्या पक्षाला ‘कलेक्ट’ करणे आवश्यक होते का; यावरून संशोधकांमध्ये वादाला तोंड फुटले आहे.
या पक्षाला ‘कलेक्ट’ करण्याचा निर्णय घेणे हे सोपे नव्हते. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा पक्षी वाटतो तितका दुर्मीळ नाही. त्यामुळे या पक्षाचा अभ्यास करून इतर पक्षांना वाचविण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण जड अंत:करणाने हा निर्णय घेतला; असे सांगत फिलार्डी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थ केले आहे.
‘संशोधनाच्या नावाखाली आम्ही जीवशास्त्राला रक्तरंजित करून टाकले आहे. मात्र खरोखर त्याची आवश्यकता आहे काय; याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे; असे मत कोलोरॅडो विद्यापीठातील उत्क्रांत जीवशास्त्र प्राध्यापक मार्क बेकॉफ यांनी व्यक्त केले.
