
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली. भारताच्या स्वच्छतेला आव्हान देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उघड्यावर शौचाला बसणे. अद्यापही भारतातील ५३ टक्के घरांमध्ये शौचालये नाहीत. तिथे शौचालय बांधून उघड्यावर शौचाला बसण्याच्या प्रथेचे २०१९ सालपर्यंत पूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांच्या या निर्धारानुसार देशात वर्षभरात ६ कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र आपल्या देशामध्ये शौचालय बांधण्याचा जेवढा उत्साह असतो तेवढा त्यांचा वापर करण्याचा उत्साह नसतो. त्यामुळे एका पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की ६ कोटीपैकी १ कोटी ३० लाख शौचालये वापरात आलेली नाहीत. या शौचालयांमध्ये कोणी सरपण साठवतंय तर कोणी कोणी या छान खोलीचा वापर स्टोअररुम म्हणून सुरू केला आहे.
स्वच्छ भारत मोहिमेतील काही दोष
केवळ शौचालये बांधणे म्हणजे स्वच्छ भारत नव्हे. शौचालये हा स्वच्छ भारत मोहिमेचा एक भाग आहे. घराघरात शौचालये असावे असा महात्मा गांधींचा आग्रह होता आणि २०१९ साली त्यांची दिडशेवी जयंती येत आहे. २०१९ सालचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शौचालयाच्या बांधकामांना गती दिली गेली आहे. कदाचित हे उद्दिष्ट पूर्ण होईलही मात्र लोकांमध्ये शौचालयांचा वापर करण्याची प्रवृत्ती नसेल तर शौचालये बांधूनही भारत अस्वच्छच राहील. काही लोकांशी याबाबत चर्चा केली असता दोन गोष्टींची अडचण समोर आली. काही लोकांना उघड्यावरच शौचाला गेलेले आवडते. हे एक कारण आणि शौचालय बांधले आहे पण त्याचा वापर करण्यासाठी जी पाण्याची सोय हवी आहे ती सोय झालेली नाही.
तेव्हा पाण्याच्या अभावी शौचालयांचा वापर होत नाही आणि परिणामी स्वच्छ भारताचे धोरण प्रत्यक्षात उतरत नाही. काही संशोधकांनी असे म्हटले आहे की लोकांच्या सवयी बदलणे फार अवघड आहे. लोकांच्या मनावर एकंदरीतच स्वच्छ राहण्याचा संदेश बिंबवला गेला पाहिजे. त्यांना स्वच्छ राहण्याचे महत्त्व समजले पाहिजे. ते एकदा कळले की ते आपोआपच स्वच्छ रहायला लागतील. उघड्यावर शौचाला बसण्याचे परिणाम किती गंभीर आहेत हे त्यांना कळले पाहिजे. या प्रथेमुळे ग्रामीण भागात पोटांचे विकार फार पसरलेले आहेत. गावात डॉक्टरची सोय तर नसतेच पण पोटांचे त्रास नेहमीच सुरू असतात. त्यामुळे शहरात जाऊन उपाय करावा लागतो. त्यावर पैसा खर्च होतो, रोजगार बुडतो आणि कार्यक्षमता कमी होते. हे सगळे दुष्परिणाम केवळ एका वाईट सवयीचे आहेत हे लोकांना जाणवले पाहिजे.
