
भारतीय जनता पार्टी ही संघ परिवारातली संघटना आहे. संघ परिवारातल्या सर्वच संस्था संघाच्या इशार्यावर काम करतात. तसे भाजपासुध्दा संघावर विसंबून आहे. या दोन संघटनांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी दोघांचा विचार मात्र एक असतो. संघ परिवारातल्या सगळ्याच संघटनांचा योग्य समन्वय साधला जात असतो आणि त्यातून त्यांच्यातली एकवाक्यता वारंवार स्पष्ट होत असते. परंतु आता आरक्षणाच्या मुद्यावरून प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे की या विषयावरचे संघाचे म्हणणे आपल्याला मान्य नाही असा खुलासा करण्याची वेळ भाजपावर आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या संबंधात केलेल्या विधानांमुळे भारतीय जनता पार्टी अडचणीत आली आहे.
संघ विरुध्द भाजपा
आरक्षणाचा फेरविचार झाला पाहिजे हे त्यांचे विधान भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे भाजपाच्या आणि संघाच्या इतिहासामध्ये प्रथमच संघाचे काही विशिष्ट म्हणणे आहे ते भाजपाला मान्य नाही असा खुलासा भाजपाला करावा लागला आहे. अन्यथा संघ बोले आणि भाजपा हाले अशी स्थिती असते. परंतु संघाचे सरसंघचालक पहिल्यांदाच बेजबाबदारपणे बोलले आहेत आणि भाजपाला त्यास विरोध दाखवावा लागला आहे. देशाची सत्ता हाकणार्या पक्षामध्ये आणि त्या पक्षाच्या मातृसंस्थेमध्ये विचारांची एवढी दरी असावी ही गोष्ट खचितच चिंताजनक आहे. देशातल्या महत्त्वाच्या संघटनांमध्ये आणि सत्ता पदांवर अशा काही सुमार लोकांची गर्दी झालेली आहे की त्यांना आपण काय बोलत आहोत आणि आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील याची किंचीतही जाणीव नसते त्यामुळे ही अनवस्था स्थिती निर्मााण झाली आहे.
आपल्या बोलण्यामुळे समाजात विनाकारण गैरसमज निर्माण होतील. क्वचित समाजाच्या दोन गटांमध्ये मतभेदाची ठिणगीसुध्दा पडेल याचा अंदाज त्यांना येत नाही. भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेल्या काही नेत्यांनी आणि साधूसंतांनी अशी बरीच विधाने करून भाजपाला अडचणीत आणले आहे. परंतु सरसंघचालकांनी मात्र भाजपाला अडचणीत आणणारा मास्टरस्ट्रोकच काल मारला आहे. दोन महिन्यापूर्वी डॉ. भागवत यांनी, देशातल्या मागासलेल्या लोकांचे कल्याण होणार असेल आणि मागे पडलेले हे लोक पुढे येणार असतील तर उच्चवर्णीयांनी काही संधी सोडून द्यायला हरकत नाही, असे स्वागतार्ह विधान केले होते. पण हेच गृहस्थ आपण दोन महिन्यांपूर्वी काय बोललो आहोत याची कसलीही चिंता न करता आज आरक्षणनीतीचा फेरविचार झाला पाहिजे असे बोलून मोकळे झाले आहेत. आपली आजची भूमिका दोन महिन्यांपूर्वीच्या भूमिकेशी विसंगत ठरणारी आहे. याची त्यांना यत्किंचितही तमा नाही.
