बिहारचा बिगुल

combo
अखेर बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्या पाच टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यात होणार आहेत. १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात हे टप्पे पार पडतील. ८ नोव्हेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. बिहारची ही निवडणूक फार महत्त्वाची आहे कारण तिच्यावर उत्तर भारतातले राजकारण ठरणार आहे. बिहार हे हिंदी भाषिक पट्टयातले उत्तर प्रदेश खालोखालचे मोठे राज्य आहे. पूर्वी असे म्हटले जात होते की देशाचे भवितव्य लोकसभेच्या ८५ जागा असलेला उत्तर प्रदेश आणि ५७ जागा असलेला बिहारच ठरवतात. लोकसभेच्या एक तृतियांश जाग केवळ या दोन राज्यांतून येतात. अर्थात आता ते चित्र राहिलेेले नाही कारण बिहारचे विभाजन झाले असून झारखंड वेगळा झाला आहेे. आता बिहारमध्ये लोकसभेच्या ५७ जागा नसून केवळ ४० जागा उरल्या आहेत पण बिहारच्या निवडणुकीचे पडसाद उत्तर प्रदेशातही उमटतात आणि उत्तर प्रदेशातली विधासभेची निवडणूक २०१७ साली होणार आहे. या दोन राज्यातल्या निवणुकांतून देशात तिसरा पर्याय उभा राहू शकतो का याचा अदमास येणार असल्याने ही निवडणूक महत्त्वाची वाटत आहे.

या निवडणुकीचे एक वैशिष्ठ्य असे की तिच्यात भाजपाच्या विरोधात सर्व भाजपा विरोधकांना इकत्र करण्याचा प्रयत्न चालला आहेे. त्या प्रयत्नाला निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच तडे गेले आहेत पण तरीही ते सांधून जनता परिवाराला संघटित करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. त्यात यश येण्याची शक्यता कमीच आहे पण त्या दिशेने किती पावले पडतात याचा तरी अंदाज येणार आहे. देशात भाजपाचे सामर्थ्य वाढत चालले आहे. कॉंग्रेस पक्ष लयाला जात आहे. बिहारमध्ये तर तो आता औषधा पुरताही उरलेला नाही. पण तरीही तिसरा पर्याय उभा केल्यास भाजपाला कितपत शह देता येईल याची कल्पना या निवडणुकीत येणार आहे. आजवरचा इतिहास असे सांगतो की एखाद्या निवडणुकीत कोणाला तरी लक्ष्य करून त्याचे सारे विरोधक संघटित होतात तेव्हा लक्ष्य झालेला तो नेता किंवा पक्ष जनतेच्या आकर्षणाचा विषय ठरून तोच निवडून येतो. १९७० च्या दशकात इंदिरा गांधी यांना असेच लक्ष्य करण्यात आले होते. देशातले चार पक्ष त्यांच्या विरोधात बडी आघाडी स्थापन करून उभे होते पण या बड्या आघाडीची वाताहत झाली आणि इंदिरा गांधीच पराभूत झाल्या. ही बडी आघाडी तशी एकजीव होती. त्यात संघटना कॉंग्रेस, जनसंघ, समाजवादी पार्टी आणि स्वतंत्र पार्टी असे चार पक्ष होते. त्यांच्यात फारशी बेदिली नव्हती. आघाडी समर्थ असूनही तिचा पराभव झाला.

हे चार पक्ष इंदिरा गांधी यांच्या एकाधिकार शाहीला आव्हान देत होते आणि इंदिरा गांधी यांची एकाधिकारशाही खरोखरच वाढली होती. नंतर ती आणीबाणीच्या रूपाने प्रकटही झाली. म्हणजे चार पक्षांच्या आघाडीचे कारण योग्य होते आणि आघाडीत एकजिनसीपणाही होता. तरीही निवडणुकांत इंदिरा गांधीच जिंकल्या. आता नरेन्द्र मोदी यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करून लालू आणि नितीशकुमार एकत्र आले आहेत. त्यांचा जनता परिवार वाढवण्याचा बेत होता. त्यात शरद पवार आणि मुलायमसिंग यांनी सामील व्हावे अशी त्यांची कोशीश होती. पण या दोघांनी परिवारातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तिसर्‍या आघाडीत निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच बेदिली माजली आहे. या फुटीने गांजलेल्या परिवाराला अरविंद केजरीवाल यांनी आपला टेकू दिला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटना स्थापन करणारे केजरीवाल आणि भ्रष्टाचारात गुंतल्यामुळे एक वर्षाची सजा झालेले लालूप्रसाद हातात हात घालून मोदींना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत यासारखा मोठा विनोद काय असेल? या दोघांचा समान मुद्दा एकच आहे. तो म्हणजे मोदी द्वेष आणि अस्तित्व टिकवण्याची धडपडे.

अशा मुद्यावरच परिवार तयार झाला आहे. या परिवारातले दोन मोठे पक्ष म्हणजे लालूंचा राजद आणि नितीशकुमार यांचा जनता दल (ए). पण याच दोन पक्षांत मुळात मनोमीलन झालेले नाही. कारण हे दोघे गेली २० वर्षे परस्परांच्या विरोधात होते. ते आता हातात हात घालत आहेत पण कोण कोणाचा घात करील याचा नेम नाही. या दोघांनी कॉंग्रेसलाही आपल्यासोबत घेतले आहे. कॉंग्रेसची ही अवनती केविलवाणी आहे. देशव्यापी संघटन असल्याचा दावा करणारा ६० वर्षे सत्ता भोगलेला पक्ष प्रादेशिक पक्षांनी फेकलेल्या २५ जागांवर लढत आहे. भाजपाच्या आघाडीत जितनराम मांझी, राम विलास पासवान आणि पप्पू यादव हे तिघे सामील आहेत. पूर्वी पासवान, लालू, मांझी, पप्पू यादव, नितीशकुमार हे एकाच पक्षात होते. कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी लढत होते पण आता कॉंग्रेसचा हात हातात घेऊन परस्परांना संपवण्यासाठी झटायला लागले आहेत. देशातल्या समाजवाद्यांची ही वाताहत पाहिली म्हणजे त्यांची किंव कराविशी वाटते. त्यातल्या त्यात नितीशकुमार यांनी तर भाजपाशी १७ वर्षे संसार करून आता काडीमोड घेतला आहे. भाजपाला कठीण काळ असताना ते त्याच्या सोबत होते पण आता भाजपाला चांगले दिवस आले असताना ते भाजपाच्या विरोधात जाऊन स्वत:चे करीअर संपवून घेत आहेत.