
नेल्सेच्या टू मिनिट मॅगी नूडल्स वर्षअखेरी पुन्हा एकदा भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. ऑगस्टमध्ये न्यायालयाने संपूर्ण देशात मॅगीवर घातलेली बंदी मागे घेण्याचे आदेश देऊन कंपनीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर कंपनीने पुन्हा एकदा गेलेली पत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. आक्टोबरमध्ये मॅगीचे उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे कंपनीचे नवे सीईओ सुरेश नारायण यांनी सांगितले.
वर्षअखेरी बाजारात पुन्हा दाखल होणार मॅगी
मे महिन्यात प्रमाणाबाहेर लेड वापरले गेल्याचे निष्पन्न झाल्यावर बाजारात पूर्णपणे माघारी घेण्यात आलेल्या मॅगीमुळे कंपनीला साडेचार अब्ज रूपयांचे नुकसान सोसावे लागले होते. त्या विरोधात कंपनीने न्यायालयाल लढविलेल्या केसचा निकाल कंपनीच्या बाजूने लागला. अर्थात मॅगी बाजारात पुन्हा दाखल होण्यापूर्वी अन्न औषध प्रशासनाच्या सर्व चाचण्या पार पाडूनच येणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने केसचा निकाल देताना अन्न व औषध प्रशासनातर्फे केल्या जात असलेल्या चाचण्यांवरही आक्षेप घेतला होता.
सुरेश नारायण म्हणाले सध्या आमचा टॉप अजेंडा मॅगी पुन्हा बाजारात आणणे हाच आहे. कारण आमच्या व्यवसायाचा १/४ हिस्सा हा मॅगी उत्पादनाचा आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत सुरू असलेल्या चाचण्यांच्या अहवालाची आम्ही प्रतीक्षा करतो आहोत. हा अहवाल आक्टोबच्या सुरवातीला येण्याची शक्यता आहे त्यानंतर उत्पादनाला सुरवात केली जाईल.
ग्राहकांसाठी मॅगीने २४/७ हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच सोशल मिडीयावर सक्रीयता वाढविणे आणि देशभरातील हजारो सप्लायर व ४० लाख स्टोअर्स मालकांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणे ही कामेही युद्धपातळीवर केली जात असल्याचे समजते.
