
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) चे चेअरमन म्हणून गजेन्द्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून या संस्थेतले विद्यार्थी त्यांच्या नेमणुकीच्या विरोधात संपावर गेले आहेत. त्यांची ही मागणी किती योग्य आहे आणि तिच्यात काय तथ्य आहे यावर फार दळण दळले गेले आहे. पण या आंदोलनाच्या संदर्भात आता आंदोलन म्हणजे काय आणि ते कसे चालवावे यावर विचार सुरू झाला आहे. कारण एखादे आंदोलन कसे करावे याचेही काही शास्त्र असते. उगाच चार पोराठोरांनी एकत्र येऊन काही बाही केले म्हणजे ते आंदोलन ठरत नाही. मुळात ज्या मागणीसाठी आंदोलन केले जाते ती मागणी काय आहे आणि ती मागणी समाजासाठी किती जिव्हाळ्याची आहे याला महत्त्व असते. कोणी तरी आंदोलन सुरू केले तर त्यांच्या मागणीचे महत्त्व जनतेला कळले पाहिजे आणि जनतेत तिच्यावरून प्रक्षोभ निर्माण झाला पाहिजे तर सरकार अशा आंदोलनाची दखल घेते कारण सरकारला जनतेचा प्रक्षोभ परवडणारा नसतो.
आंदोलनाचे शास्त्र
एफटीटीआयचा चेअरमन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक नेमला गेला तर काही डाव्या विचाराच्या लोकांच्या मनात रोष निर्माण झाला असेल पण सर्वसाधारण जनतेला त्यामुळे काय फरक पडणार आहे ? तिथे संघाचा माणूस नेमला काय की साम्यवादी नेमला काय त्यामुळे सामान्य माणसाला काही फरक पडणार नाही. या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला जनतेचा पाठींबा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून या आंदोलनाला माध्यमात बसलेले काही कथित डावे पत्रकार वारंवार ‘उग्र’ आंदोलन म्हणत असले तरी ते कधीच उग्र होऊ शकणार नाही.
सरकारने त्याबाबत ठंडा करके खाव चे धोरण स्वीकारले आहे. या आंदोलनामुळे ही संस्था बंद पडली तरीही देशाचे काही फार नुकसान होणार नाही. शिवाय या आंदोलकांना एकदा कायद्याचा बडगा दाखवला की ते आपोआप थंड पडणार आहेत. सरकारने ते अस्त्र राखून ठेवलेले दिसत आहे. कायद्याने त्यांना चेअरमन कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार दिलेला नाही. संस्थेचा चेअरमन कोण असावा हे विद्यार्थ्यांना विचारले जात नसते. म्हणजे मुळात या मुलांचे आंदोलन बेकायदा आहे. त्यांना सरकार संस्थेतून बडतर्फही करू शकते. न्यायालयाचाही त्यांना पाठींबा मिळू शकत नाही. आंदोलन करणाराही सामर्थ्यशाली असावा लागतो. या मुलांकडे तसे संघटनात्मक सामर्थ्यही नाही. सरकारने त्यांच्याशी चर्चा करायचीच नाही अशी ठाम भूमिका घेतली तर ते सरकारचे काहीही वाकडे करू शकत नाहीत. काही दिवसात हे आंदोलन मिटले नाही तर ते एक अनावश्यक आंदोलन म्हणून आपोआप संपणार आहे.
