मुंबईला न्याय मिळाला

blast
१९९३ सालच्या मुंबईतल्या बॉंबस्फोटांतील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला आरोपी याकूब मेमन याला अखेर फासावर लटकवण्यात आले. त्याच्या फाशीच्या शेवटच्या टप्प्यात फार नाट्यमय घडामोडी घडल्या पण शेवटी त्याच्या घृणास्पद कृत्यामुळे ज्या २५७ जणांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती त्यांना न्याय मिळाला. खरे तर सार्‍या मुंबईला आणि दहशतवादाने पोळलेल्या देशालाच न्याय मिळाला आहे. आज काही बनावट नेते आणि स्वार्थी पुढारी याकूब मेमनच्या नावाने गळे काढत आहेत आणि त्याला सहानुभूती दाखवण्याचे नाटक करीत आहेत. यात काही मानवतावादी नेतेही आहेत पण या लोकांना असा प्रश्‍न विचारावासा वाटतो की त्या २५७ जणांनी याकूबचा काय गुन्हा केला होता ? त्यांना मारून टाकण्याचा त्याला काय अधिकार होता ? त्यांचे प्राण गेले. त्या निरपराध लोकांच्या नावाने हे मानवतावादी नेते गळे का काढत नाहीत ? मानवी हक्क संघटनांचा हा ढोंगीपणा नेहमीच एक कोेडे बनून गेला आहे. त्यांना विचारल्या जाणार्‍या या प्रश्‍नाचे त्यांच्यापैकी कोणीही कधीही तर्कशुद्ध उत्तर दिलेले नाही.

या लोकांना अशी एखादी फाशीची सजा अंमलात आणली जायला लागली की, मुळात फाशी ही शिक्षाच रद्द झाली पाहिजे या मागणीचा उमाळा येतो. हा विषय चर्चेला आला पाहिजे पण तो नेमका अशा देशद्रोेही नराधमांच्या फाशीच्या वेळीच या लोकांना का सुचतो हे कळत नाही. एखादी फाशी दिली जात असतानाच जर या शिक्षेची तरतूदच रद्द करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली तर तिला प्रतिसाद म्हणून अशी फाशी रद्द होत नसते हेही या मूढ लोकांना कळत नाही. ही तरतूदच रद्द होणार असेल तर त्यासाठी मोठी चर्चा होईल आणि तो निर्णय संसदेला घ्यावा लागेल. असा तो या लोकांच्या मागणीवरून आणि कोणी तर अध्यादेश काढून अंमलात आणला जात नाही. जगातल्या काही देशांत फाशीची सजा देण्याचीच तरतूद नाही असे या लोकांचे म्हणणे आहे आणि त्याचे अनुकरण करून भारतातही ही शिक्षा रद्द व्हावी असे त्यांचे मागणे असते. पण जशी काही देशांत ही शिक्षा रद्द झाली आहे तशीच अमेरिकेसह अनेक देशात ती अजूनही दिली जाते हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. एकंदरीत याकूब मेमनच्या फाशीच्या प्रसंगीच ही चर्चा करणे अनुचित आहे. त्याची फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत काही लोकांनी कायद्याच्या आधारावरही धडपड जारी ठेवली होती. त्यांना ही घटना नाट्यमय करता आली यापेक्षा त्यातून काही निष्पन्न झाले नाही. राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तत्परतेमुळे ही धडपड व्यर्थ ठरली.

या संबंधात काल मध्यरात्री नंतर न्यायालयीन कामकाज जारी राहिले. शेवटी फाशी देण्याच्या चार तास आधी त्याचे सारे अर्ज नांमजूर करून त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सार्‍या घटनांमुळे सरकारने अपवादात्मक पद्धतीने रात्री कामकाज चालवून फाशी नक्की केली असा कोणाचा समज होऊ शकतो पण हा प्रकार तसा नाही. काल पहाटे तीनच्या सुमारास जो निर्णय झाला तो फार पूर्वीच झालेला होता. तो काही काल पहाटे नव्याने झ्रालेला नाही. न्यायालयाची सारी प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण होऊन ३० तारखेच्या पहाटे त्याला फाशी द्यावी असे डेथ वॉरंटही जारी झाले होते. त्याचा अवमान होऊ नये म्हणून ३० तारखेच्या पहाटेपर्यंत कामकाज चालवले एवढेच. आरोपीला न्यायाच्या सगळ्या सवलतींचा लाभ घेता आला नाही असा आरोप करण्याची संधी मिळू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज रात्रीच विचारात घेतला आणि तो फेटाळून आपल्या न्यायदानाची होणारी थट्टा थांबवली. मेमन याचे काही समर्थक अजूनही शेवटचा काही पुरावा होता असाच दावा करीत आहेत. विशेषत: रॉ च्या अधिकार्‍याने मेमनला चांगल्या वागणुकीचे प्रमाणपत्र दिले आहे त्यावरून त्याची फाशी रद्द करावी असे काही लोकांचे म्हणणे आहे.

असे लोक जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याशिवाय काही करीत नाहीत. पण त्यांचा बनावटपणा उघड करण्याची गरज असते. फाशीच्या शिक्षेचा राजकीय लाभ घेण्यास टपलेला एखादा नेता कसले तरी युक्तिवाद करतो आणि त्यावरून जनतेचीही दिेशाभूल होत असते पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की, न्यायालयात हा खटला अनेक वर्षे चाललेला असतो. न्यायालयात दोन्ही बाजू मांडल्या जात असतात. आरोपीने आपल्या वकिलांना सारी हकिकत सांगितलेली असते. अशा स्थितीत गुन्ह्याच्या संबंधात एखादाही मुद्दा मागे राहण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. सार्‍या मुद्यांचा महिनोन महिने कीस पाडला गेलेला असतो. पण त्यातलाच जनतेची दिशाभूल होईल असा एखादा मुद्दा तो आपल्या दिवाणखान्यात बसून शोधून काढतो आणि जणू आपल्याला काही तरी वेगळे गवसले आहे असा भास निर्माण करून आरोपीवर मोठा अन्याय होत असल्याचा कांगावा करतो. तो मुस्लिम असल्याने त्याला फाशी होत आहे, टायगर मेमनच्या गुन्ह्याची सजा विनाकारण याकूबला दिली जात आहे, मुळात फाशीची शिक्षाच रद्द होण्याची गरज आहे, यालाच फाशी का ? मुंबई दंगलीतल्या आरोेपींना अशीच शिक्षा का दिली जात नाही असे हे सारे फुसके युक्तिवाद असतात. पण, न्यायालयात जेव्हा महिनोन् महिने खटला चाललेला असतो तेव्हा अशा मुद्यांचा उहापोह झालेला असतोच. पण काही लोकांना जादा हुशारी दाखवून फासावर चाललेल्या आरोपीच्या टाळूवरचे लोणी चाटायची हौसच असते त्याला काय करणार?