पन्नाशी शिवसेनेची

shivsena
शिवसेनेचा मोठा आधार म्हणजे बाळासाहेब. ते गेले आणि शिवसैनिक पोरके झाले. आता शिवसेनेचे काय होणार असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात दाटून आला. पण वर्षा दोन वर्षात असे लक्षात आले की, उद्धव ठाकरे यांचे पुरेसे मजबूत आहेत. बाळासाहेब गेले तरी शिवसेना मरणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ती यथावत सुरू राहील. यात खरे तर काही नवल नव्हते. भारतात असे अनेक वेळा घडले आहे. वडील जावेत आणि आता पोराला काही जमते की नाही असा प्रश्‍न निर्माण व्हावा पण कालांतराने तो प्रश्‍नच निरर्थक ठरलेला दिसावा असे अनेकदा झाले आहे. त्याला आपला सारा इतिहास साक्षी आहे. तेव्हा बाळासाहेबांच्या पश्‍चात शिवसेना टिकली यात फार काही नवल घडलेले नाही. आता तिला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पण शिवसेनेच्या या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विविध माध्यमांत जी विश्‍लेषणे आली आहेत त्यात प्रामुख्याने, ‘आता शिवसेनेचे भवितव्य काय,’ असाच प्रश्‍न विचारलेला दिसतो. बाळासाहेब गेले तेव्हा हा प्रश्‍न साहजिक होता पण आता उद्धव ठाकरे यांचे सारे काही ठीक चालले असतानाही पुन्हा वर्धापनदिनाच्या औचित्याने हाच प्रश्‍न का निर्माण होत आहे?

शिवसेनेच्या कामात काही तरी नकारात्मक दिसायला लागले असावे म्हणून लोकांना तिच्या भवितव्याविषयी शंका येत असाव्यात असे वाटते. खरे तर आता शिवसेनेचे भवितव्य काय असा प्रश्‍न काही प्रथम निर्माण झालेला नाही. या पूर्वी तो काही वेळा निर्माण झालेला होता. १९९२ साली छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या प्रभावाखाली येऊन सोबत २२ आमदार घेऊन शिवसेनेचा त्याग केला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हाही हा प्रश्‍न निर्माण झाला होता. पण १९९५ साली शिवसेनेने भाजपाच्या सहकार्याने का होईना पण महाराष्ट्रातली सत्ता काबीज केली आणि या प्रश्‍नाचे चोख उत्तर दिले. ज्या छगन भुजबळांच्या बाहेर जाण्याने हा प्रश्‍न निर्माण झाला होता त्या भुजबळांच्याच भवितव्यावर आता एवढे गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे की, भुजबळ यांचे काय होणार हा प्रश्‍न सौम्य वाटायला लागला आहे. आता भुजबळांना किती शिक्षा होणार असा प्रश्‍न विचारला जात आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनीही शिवसेनेला असेच धक्के दिले. त्याही वेळा आता शिवसेनेचे काय होणार असा प्रश्‍न विचारला गेला. या दोन्ही धक्क्यांच्या वेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते. तरीही अनेकांनी या प्रश्‍नात तथ्य असल्याचा निर्वाळा दिला होता. आता शिवसेना पुन्हा डोके वर काढू शकणार नाही किंवा शिवसेनेला या दोघांमुळे मोठा फटका बसेल असे स्पष्टपणे म्हटले जायला लागले होते.

दरम्यान बाळासाहेबांचा आधार गेला. उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा येऊन पडली. बाळासाहेब हयात असतानाच लोकांना शिवसेनेच्या भवितव्याविषयी शंका वाटत होत्या. आता तर ते नाहीत म्हणजे फारच वाताहत होणार असे बोलले जायला लागले पण हे अंदाज फोल ठरले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुसंडी मारली. उलट राज ठाकरे आणि नारायण राणे यांनाच राजकारणात कोठे दिसतात का म्हणून शोधावे लागत आहे. शिवाय शिवसेेनेने औरंगाबाद आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकल्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत ६३ जागा जिंकल्या. या घटनांनी आता शिवसेनेचे काय होणार या प्रश्‍नाला आता काही स्थान नाही असे सिद्ध झाले असले तरीही या टिकून राहण्यातून पक्षासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली दिसत आहेत. राणे, भुजबळ आणि राज ठाकरे हे संपले असले तरीही त्यांच्या संपण्यात शिवसेनेचा वाटा काय हा प्रश्‍न आहे. त्यांना शिवसेनेने संपवलेले नाही. भुजबळ आपल्या भ्रष्टाचाराने, नारायण राणे आपल्या संवाद कौशल्याने संपले आहेत. राज ठाकरे यांच्यात मुळातच राजकारणात काही करण्याची क्षमता नाही. त्यांना त्यांच्या या सुमार वकुबाने संपवले आहे. त्यात शिवसेनेची काही मर्दुमकी नाही.

त्यांच्या संपण्याने शिवसेनेची ताकद काही वाढलेली नाही. उलट महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत शिवसेना हा थोरला आणि भाजपा हा धाकला भाऊ होता. या नात्याची अदला बदल झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठत्व भाजपाने पटकावले आहे आणि शिवसेनेच्या महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपाच्या कृपेने सत्ता मिळाली आहे. या स्थानाची अदलाबदल का झाली याचा विचार शिवसेनेला करावा लागेल. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना विधानसभेच्या ६३ जागा मिळाल्याच्या आनंदातून बाहेर पडावे लागेल. आपल्याला ६३ जागा मिळाल्या याच्या आनंदापेक्षा आपल्या धाकल्या भावाला ११२ जागा कशा मिळाल्या यावर विचार करावा लागेल. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना टिकली, शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानला या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाच्या आहेत पण पक्ष जेमतेम टिकवून ठेवण्याच्या पल्याड जाऊन पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा विचार त्यांना करावा लागणार आहे. त्यासाठी पक्षाच्या नेतृत्वात अधिक परिपक्वता येण्याची गरज आहे. सध्या शिवसेनेची प्रवृत्ती सस्त्या राजकारणाच्या आहारी जाऊन लोकप्रियता मिळवण्याचे हातखंडे वापरण्याकडे आहे. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यातून शिवसेनेची ही प्रवृत्ती दिसून येते. यात काही दूरदर्शीपणा दिसत नाही ही चिंतेची बाब आहे.