
जगात अनेक ठिकाणी विविध तर्हेची शिल्पे उभारली जातात. त्या त्या ठीकाणी भेट देणार्या पर्यटकांसाठी ती आकर्षण केंद्रेही असतात. मात्र कांही शिल्पे नजरबंदी करतात कारण ती उभारताना अतिशय कलात्मक नमुन्यात उभारली गेलेली असतात. तोंडात बोटे घालायला लावतील अशीच ही कांही शिल्पे.
नजरबंदी करणारी कांही अनोखी शिल्पे
रोमानियातील प्रसिद्ध कवी मिहाई एमिनेस्क्यूचे ओनेस्टी येथील शिल्प अद्भूत म्हणावे असेच आहे. कवी कल्पनेतून आपल्या कवितांची शिल्पे उभारतो त्याला मानवंदना देणारे हे शिल्प. यात कवीचा चेहरा वेगळ्याच कलात्मक प्रकाराने दाखविला गेला असून त्यासाठी झाडाच्या फांद्याचा अनोखा वापर केला गेला आहे. या फांद्यातून कवीचा चेहरा दृगोचर होतो. सायंकाळच्या वेळी हे शिल्प फारच मनोहारी दिसते.

आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांचे मार्को सियानफानेली याने उभारलेले शिल्पही असेच सुंदर आणि अनोखे आहे. यात ८ ते १० मीटर उंचीच्या ५० स्टील रॉडचा वापर करून मंडेलांचा चेहरा दाखविला गेला आहे. लेजरकटने उभारले गेलेले हे ५० स्टील रॉड म्हणजे मंडेलांनी ५० वर्षे सातत्याने दिलेल्या लढ्याचे प्रतीक आहेत. २०१२ साली या शिल्पाचे उद्घाटन केले गेले आहे.

असेच अनोखे शिल्प बेल्जिमय मध्ये आहे.मात्र हे करमणूक करणारे फनी शिल्प आहे. टॉम फेंरटनेज याने बनविलेल्या या शिल्पात एका पोलिसाचा पाय ड्रेनेजमध्ये लपलेल्या माणसाने पकडला असल्याचे दिसते. ब्राँझमध्ये बनविले गेलेले हे शिल्प १९८५ मध्ये उभारले गेले आहे आणि पर्यटकांचे हे मोठे आकर्षणही आहे.
