मॅगीचा वाद दोन दिवसांचाच

maggi
मॅगीने सार्‍या जगात, ‘बस्स दोन मिनिटात’, हा शब्द प्रयोग चांगलाच लोकप्रिय केला. आता या मॅगीवरून वाद आणि चर्चा सुरू झाल्या आहेत पण या चर्चाही बस्स दोन दिन चालतील आणि नंतर त्या थंड पडतील असे एकंदर प्रकरण पाहिल्यावर वाटायला लागले आहे. मॅगीच्या वादात तसे फार तथ्य नाही पण ते मॅगीमुळे मर्यादेपेक्षा अधिक चर्चिले जात आहे. काही वर्षांपूर्वी असाच वाद कोका कोला आदि थंड पेयांवरून निर्माण झाला होता. तो आता कोणाला आठवतही नाही. मॅगीचे उत्पादन नेसले या यूरोपीय कंपनीकडून केले जाते. काही वेळा आपल्याही देशातल्या लोकांचे नवल वाटते. आपण परदेशातले काहीही विक्रीला आले की ते भारी किंमत देऊन खात सुटतो. मॅगी दोन मिनिटात होते म्हणून लोकप्रिय झाली आहे पण आपल्या घरातल्या शेवया हा मॅगीला चांगला पर्याय आहे. शेवयाची खिचडीही दोन मिनिटात होत असते पण आपल्याला भोगवादाच्या नशेत काहीच कळेनासे झाले आहे.

तर अशा या नेसले कंपनीने आपल्या नूडल्स मध्ये मान्यतेपेक्षा अधिक रसायने वापरली हा तिच्यावरचा आक्षेप आहे. अशा प्रकारे अन्न आणि औषध प्रशासनाचे निर्बंध झुगारून काही उत्पादन करणे आणि त्याची बेकायदा विक्री करणे हा गुन्हा आहे आणि त्यावर कारवाई करणे हा सरकारच्या नेहमीच्या कामाचा भाग आहे. त्याची एवढी चर्चा होण्याचे काही कारण नव्हते पण चर्चा होत आहे आणि अजून काही दिवस होत राहणार आहे. आता या प्रकरणात कंपनीवर खटला भरला जाईल आणि आपल्या न्यायालयांच्या वेगानुसार खटल्याचे काम सुरू होईल तेव्हा लोकांना या सार्‍या प्रकरणाचा विसरही पडेल. तसा विसर पडला की, माध्यमांनाही त्यात काही रस राहणार नाही. पण आता जोरात चर्चा सुरू आहे. खरे तर उत्तर प्रदेशातल्या ज्या सरकारी अधिकार्‍याने मॅगीला उघडे पाडले त्याने दोन वर्षांपूर्वी या कंपनीसोबतच अन्यही अनेक उत्पादकांना फैलावर घेतले होते. बाजारात येणार्‍या खाद्यपदार्थांचे उत्पादक अशा उत्पादनाबाबतचे कायदे पाळतात की नाही याची नेहमीप्रमाणे चौकशी केली जात होती आणि या चौकशीत ८०० पदार्थांचे नमुने गोळा केलेले होते. त्यातले १५ नमुने आक्षेपार्ह असल्याचे दिसून आले आणि यावरून त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. असे १५ खटले भरले असूनही त्यातल्या एकाही खटल्याची एका ओळीचीही बातमी छापून आली नाही आणि कोणत्याही माध्यमाने हा विषय चर्चेला घेतला नाही.

मॅगीला मात्र हे भाग्य लाभले. कारण मॅगी हे जगभरात विकले जाणारे फास्ट फूड आहे. भारतातले लोक दरसाल १० हजार कोटी रुपयांची मॅगी खातात. शिवाय मॅगीचे उत्पादन करणार्‍या नेसले कंपनीवर मॅगीच्या निमित्ताने खटला भरला की त्या अनुषंगाने मॅगीच्या जाहीरातीत झळकलेले अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांनाही न्यायालयात खेचले जाणार आहे. एखाद्या किरकोळ घटनेत सेलिब्रिटीज गुंतल्या की ती घटना कितीही किरकोळ असली तरी तिची बातमी होते. या तिघांचा या घटनेशी काहीच संबंध नसता तर या बातमीला कोणी खाल्ले नसते. कंपनीबरोबर या तिघांवरही दोषारोप ठेवता येतो की नाही यावर आता खमंग चर्चा सुरू आहे. मॅगीत अजिनोमोटो घातले जाणार नाही असे कंपनीने परवाना मिळण्याच्या आधी कबूल केले होते. कोणत्याही खाद्यपदार्थाच्या पाकिटावर त्यातल्या घटकांची नोेंद करायला हवी पण मॅगीच्या पाकिटावर त्यात अजिनोमोेटो असल्याचे नमूद केलेले नव्हते.

मॅगीत शिसेही असल्याचे दिसून आले. दर दहा लाख परिमाणात २.५ टक्के शिसे असायला काही हरकत नाही अशी कंपनीला अनुमती मिळाली होती पण कंपनीने हे प्रमाण २.५ भागावर नियंत्रित ठेवले नाही. हे प्रमाण १७.५ भाग एवढे असल्याचे नमुन्यांच्या चाचणीत आढळले. कंपनीचा हा नियमभंग या त्रिकुटाला माहीत होता की नाही हे काही कळले नाही पण नियमांचा भंग करून केल्या जाणार्‍या उत्पादनाची जाहीरात त्यांनी केली हा त्यांचा अपराध मानला जाणार आहे. आपल्या देशात अशा मान्यवरांच्या हातून असा गुन्हा घडला की, त्यावर चर्चा सुरू होते आणि त्यांना शिक्षा व्हावी की नाही यावर वाद रंगतात. पण आपण कधीही, ‘कायदा आपले काम करील’, अशी भूमिका घेत नाही. हे तिघे कीर्तीच्या कितीही वरच्या शिखरावर असोत त्यांनी लाखो रुपये घेऊन मॅगीची जाहीरात करताना, कंपनीला काही प्रश्‍न विचारायला हवे होते. पण त्यांनी तशी तसदी घेतलेली नाही. पण लाखो लोक त्यांची जाहीरातीतली छबी पाहूनच मॅगी खात असतात. ग्लॅमरच्या दुनियेतले लोक कसे बेफिकीर असतात हे यावरून कळते. या तिघांना जो न्याय लावला जाणार आहे तोच न्याय लावायचा तर मॅगीच्या जाहीराती करणार्‍या वृत्तपत्रांवर आणि माध्यमांवरही खटले भरायला हवेत. या सेलिब्रिटींवर खटले भरले पाहिजेत असे म्हणणार्‍या माध्यमांनी या मुद्याचा विचार केला आहे का ? आता माध्यमांना, जाहीरात कंपन्यांना आणि मॉडेल म्हणून काम करणारे कलावंत, खेळाडू या सर्वांना जाहीरात करताना काही ना काही विचार करावा लागणार आहे. मिळाले पैसे म्हणून केली कोणाचीही जाहीरात असा बेफिकीरपणा आता परवडणारा नाही.

Leave a Comment