
सध्याचा जमाना स्मार्ट उपकरणांचा आहे. स्मार्ट फोन पाठोपाठ गुगलचे स्मार्ट वॉच बाजारात येऊ घातले आहे. या स्मार्ट वॉचमधून आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. हे पाहिल्यावर आपण एखादा चमत्कार अनुभवत आहोत असे वाटू लागले आहे. हातातील घड्याळाद्वारे बोलणे, फोटो काढणे, ई-मेल पाठवणे या सारखी कामे करता येतील अशी कल्पनाही आपण पूर्वी कधी केली नसेल. मात्र या कल्पना आता प्रत्यक्षात येऊ लागल्या आहेत.
जादूई उपकरणांच्या यादीमध्ये आता छत्रीचाही समावेश केला जाणार आहे. कारण बाजारात आता स्मार्ट छत्र्या दाखल होणार आहेत. उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये छत्रीची गरज माणसाला भासते. मात्र अनेकांना छत्री विसरण्याची सवय असते. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात वापरताना अनेक जण ऑफिस वा अन्य ठिकाणी आपली छत्री विसरून येतात असा अनुभव आहे. छत्री विसरण्याची ही सवय लक्षात घेऊन न्यूयॉर्कमधील स्टार्टअप डेवेक या कंपनीने स्मार्ट छत्री बनवली आहे. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी छत्री विसरून जात आहात तर तुमच्या फोनवर तशी सूचना दिली जाणार आहे. या छत्रीची किंमत आहे १२५ डॉलर. या छत्रीमध्ये ब्ल्यू टूथची छोटी चिप बसवण्यात आली आहे ही चिप अॅण्ड्रॉइड फोन आणि आयओएसच्या स्मार्ट फोनशी कनेक्ट राहणार आहे. छत्रीपासून ३० फुटांपर्यंतच्या अंतरात छत्री आपल्या फोनशी जोडलेली राहिल. एखाद्या ठिकाणी छत्री ठेवून तुम्ही जाऊ लागलात तर या चिपद्वारे तुमच्या फोनवर एक मेसेज पाठवण्यात येईल. त्यामुळे आपण छत्री विसरलो आहोत याची जाणीव आपल्याला होइल.
भारतात ही छत्री केव्हा आणली जाईल या बाबतची कसलीही माहिती उत्पादक कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र या छत्रीची किंमत पाहाता सर्वसामान्य माणूस ही छत्री विकत घेण्याचा विचारही करणार नाही.
