
पुणे- घुमान ही बाबा नामदेव यांची कर्मभूमी आहे. सेवाधर्म ही शीख धर्माची शिकवण आहे. त्यामुळे मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने संमेलनासाठी घुमानला यावे. त्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि सर्वांची खास पंजाबी खातिरदारी करू, असे आवाहन घुमानचे सरपंच हरबंससिंग यांनी येथे केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सदनामसिंग, सुखदेवसिंग, संतसिंग मोखा तसेच वीणा मनचंदा होत्या. घुमानच्या मंडळींचा खास सत्कार साहित्य महामंडळाच्या वतीने येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन तसेच प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरहद संस्थेचे संजय नहार, स्वागताध्यक्ष भारत देसलडा या वेळी उपस्थित होते. घुमान ही बाबा नामदेवांची भूमी आहे. तेथे नामदेवांचे मंदिर आहे. समाधी आहे. या एकाच ठिकाणी गुरुद्वारा, मंदिर, मशीद, समाधी आहे. उभ्या देशात राष्ट्रीय एकात्मतेचा असा संदेश देणारे हे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे, अशी भावना हरबंससिंग यांनी व्यक्त केली.
