
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही मोदींच्या ’स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी झाले असून त्यांनी आज सहकुटुंब साफसफाई केली. त्यामुळे पवारांच्या पुढच्या ’चालीबद्दल’ तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बारामती येथे समस्त पवार कुटुंब आज स्वच्छता अभियानासाठी रस्त्यावर उतरले होते. पवारांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वच्छता केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसेच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली. शरद पवार यावरच थांबणार नाहीत. बारामतीच्या शेजारीच असलेल्या मूर्टी या गावात लवकरच पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतल्यामुळे शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
