
मुंबई – पंतप्रधान कार्यालयातील सगळे जुने कर्मचारी नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर बदलला होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार देखील मोदींचे अनुकरण करीत असल्याचे दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे मोदींच्या पावलावर पाऊल
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात मागील १५ वर्षांपासून सरकार होते. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांकडे मागील १० ते १५ वर्षांपासून तेच सचिव, खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. मात्र आता सरकार बदलल्यामुळे हा स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी आणि मंत्री कार्यालयातील सर्व कर्मचारी बदलले होते.
जुन्या मंत्र्यांकडील एकही अधिकारी नियुक्त करू नये अशा स्पष्ट सूचनाच मोदी यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या होत्या. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदींचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर प्रविण दराडे यांची नियुक्ती करून देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस सरकार अत्यंत काटेकोरपणे नव्या नियुक्त्या करणार आहे. या नियुक्त्यांसाठी काही निकष लावण्यात येणार आहेत.
यात प्रामुख्याने स्वच्छ सर्व्हिस रेकॉर्ड, विकासाची दृष्टी, कष्ट करण्याची तयारी, प्रशासकीय गुप्तता पाळणारा अधिकारी यांचा समावेश असेल.
