यात कोतेपणा काय?

modi1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या कल्पनांना धक्का द्यायला सुरुवात केली आहे. सत्तेवर आलेला कोणताही पंतप्रधान आपल्या आधीच्या राजवटीने फार मोठे घोटाळे करून ठेवले आहेत आणि त्या राजवटीत देशाची पूर्ण अधोगती झाली आहे असे चित्र उभे करतो आणि त्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला फार मोठी कामगिरी करायची आहे असा आव आणतो. पण नरेंद्र मोदी यांनी असा कसलाही आव आणलेला नाही. आपल्या आधीच्या पंतप्रधानांनी या देशासाठी काहीच केलेले नाही असे आपले मत नाही. त्यांनी आपापल्या परीने आणि परिस्थिती पाहून चांगलेच काम केलेले आहे, असे प्रशंसोद्गार काढले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मृती दिन व्यापकपणे साजरा करण्याची मोहीम सुरू केली. मोदींनी तसे काही केलेले नसते तर त्यांना कोणी दोष दिला नसता, कारण सरदार पटेल हे कॉंग्रेसचे नेते होते आणि मोदी भाजपाचे नेते आहेत. मात्र त्यांना सरदार पटेल यांचे महत्व आणि इतिहासातले नेमके स्थान लोकांच्या लक्षात आणून द्यायचे आहे.

त्याचवेळी इंदिरा गांधी यांचा स्मृती दिनही होता. मात्र मोदी सरकारने सरदार पटेल यांच्या एवढे महत्व इंदिरा गांधींना दिले नाही. त्यांनी सकाळी नवी दिल्लीमध्ये दौडीच्या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला, मात्र इंदिरा गांधींच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. असे असले तरी त्यांनी ट्विटरवरून इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी इंदिराजींची अशी उपेक्षा केल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी हे कोत्या मनोवृत्तीचे आहेत अशीही आगपाखड केली. कॉंग्रेसच्या नेत्यांचा हा राग समजण्यासारखा आहे. परंतु याबाबतीत दुसर्‍या लोकांवर कोत्या मनोवृत्तीचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार कॉंग्रेसच्या नेत्यांना नाही. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आजवर कोणा कोणा महानेत्यांची अशी उपेक्षा केली आहे याची यादी केली तर त्यांना इंदिरा गांधींच्या उपेक्षेविषयी आदळआपट करण्याचा किंचितही अधिकार नाही हे लक्षात येते. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. त्यांनी गृहमंत्री या नात्याने काम करताना आजच्या स्वरूपातला अखंड भारत उभा करून दाखवला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात ६०० संस्थाने होती. भारत स्वतंत्र झाला असला तरी इंग्रजांनी व्यापलेला भारत स्वतंत्र झाला होता. संस्थाने पूर्वीच स्वतंत्र होती. ब्रिटिशव्याप्त भारत आणि संस्थाने असा मिळून भारत देश तयार झाला होता.

मुळात भारत नावाचा आज अस्तित्वात असलेला देश स्वातंत्र्यापूर्वी तसा नव्हताच. ही संस्थाने भारतात विलीन झाली आणि त्यामुळे देशाला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पण ही संस्थाने विलीन करण्याची अवघड कामगिरी सरदार पटेल यांनी कौशल्याने आणि मोठ्या मुरब्बीपणाने पार पाडली. त्यांच्या जागी दुसरा कोणी नेता असता तर हे काम शक्य झाले नसते. आपण आज ज्याला मराठवाडा म्हणतो तो भाग निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद संस्थानाचा भाग होता. ब्रिटिशव्याप भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, पण हैदराबाद संस्थान नेमके भारतात राहणार की पाकिस्तानात जाणार हा प्रश्‍न होता. त्यामुळे ते त्या दिवशी स्वतंत्र झाले नाही. सरदार पटेल यांनी हैदराबाद संस्थानावर कठोर कारवाई केल्यामुळे ते संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले, अन्यथा आजचा मराठवाडा पाकिस्तानात गेला असता. सरदार पटेल यांनी ५९९ संस्थाने विलीन करून घेतली पण केवळ जम्मू-काश्मीर हे एक संस्थान विलीन करण्याची जबाबदारी पंडित नेहरू यांनी हट्टाने मागवून घेतली आणि त्या जम्मू-काश्मीरचे काय झाले आहे हे आपण पहातच आहोत.

सरदार पटेल नसते तर भारतातली काही संस्थाने पाकिस्तानात गेली असती, काही भारतात आली असती आणि काही संस्थांनांचे जम्मू-काश्मीरसारखे प्रश्‍न निर्माण झाले असते. हा भारत देशात अशा अनेक गहन समस्यांचा गजबजाट झाला असता, पण तो झाला नाही याचे श्रेय सरदार पटेल यांना आहे. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी कधीही पटेल यांना मोठेपणा दिला नाही. कॉंग्रेसचे नेते सातत्याने गांधी-नेहरू घराण्याच्या भोवतीच फिरत राहिले. नेहरूंच्या तोडीच्या कोणत्याही नेत्याला त्यांनी मोठेपणा दिला नाही, तसा तो दिला असता तर नेहरूंचे आणि इंदिरा गांधींचे मोठेपण झाकोळून गेले असते. म्हणून कॉंग्रेसचे नेते नेहमी गांधी आणि नेहरू घराण्याच्याच आरत्या गात राहिले. सरदार पटेलांप्रमाणे सुभाषचंद्र बोस हेही मोठे नेते होते. त्यांनी तर भारताचा स्वातंत्र्यलढा जगाच्या पातळीवर नेला होता. त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून ब्रिटिश इंडियावर हल्ला करण्याची योजना आखली होती. ती थोडक्यात अपयशी ठरली, पण म्हणून नेताजींचा महिमा कमी होत नाही. खरे म्हणजे नेताजी पंडितजींपेक्षा अधिक लोकप्रिय होते, पण त्यांना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच अपघाती मृत्यू आला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी या दोन नेत्यांची उपेक्षा केली. त्याबाबतीत त्यांनी कोतेपणाच केला. इंदिरा गांधी यांची आठवण मोदींना राहिली नाही याबद्दल मोदींना शिव्याशाप देणार्‍या कॉंग्रेसजनांनी आपल्या एका तरी योजनेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे का?