विश्वासमतावेळी तटस्थ राहणार राष्ट्रवादी – पवार

sharad-pawar
मुंबई : एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचविण्यासाठी भाजपला पाठिंबा देऊ केल्याचा मुद्दा फेटाळून लावला असून केवळ राज्यात स्थिर सरकार राहावे या एका हेतूनेच आपण भाजपला पाठिंबा दिल्याचे पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केला. तसेच भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करायची वेळ असेल त्यावेळी आपले आमदार तटस्थ राहतील, असे सांगत एक नवी खेळी शरद पवारांनी खेळली आहे.

पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी भाजपाला बाहेरुन बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे. मात्र, त्यांना असा पाठिंबा नको असल्यास सभागृहात बहुमताच्या ठरावावेळी आम्ही अनुपस्थित राहून भाजपाला अल्पमतातील आणि स्थिर सरकार आणायला मदत करु.

दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेत अद्याप बोलणी पूर्ण झालेली दिसत नाहीत. चौदा दुणे अठ्ठाविसचा फॉर्म्यूलाही अद्याप पूढे सरकलेला नाही. सेनेचे नेते किर्तीकर यांनी राज्यातील भाजपाला सेना नकोशी झाल्याचे सांगितले आहे. तर भाजपा नेते विनोद तावडे यांनी आधी मनाने जवळ येऊ, असे म्हटले आहे.

भाजपा-सेनेचे चर्चेचे गुऱहाळ पूढे सरकत नसतानाच पवार यांच्या भूमिकेवर भाजपाचा पवित्रा काय असणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.