
नाशिक – अपेक्षित उमेदवाराला मतदान न केल्याच्या रागातून जेबूबाई बावळे या महिलेला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यात घडली. ही महिला बाभूळगावात राहणारी असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी अशोक सोपान पोरनाळे, पांडूरंग सोपान पोरनाळे आणि नंदकिशोर गोरख या तिघांना अटक करण्यात आले आहे. हे तीनही आरोपी कोणत्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ही महिला ६० वर्षांची असून तिला एका उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र नीट दिसत नसल्याने तिने दुसऱ्या उमेदवारासमोरील बटण दाबले. याची माहिती मिळताच संतापलेल्या कार्यकर्त्यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वृद्ध महिलेला आधी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असून रुग्णालयाचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
