कोकण कॉंग्रेसच्या हातातून निसटणार का?

congress
कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या तीन जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या १५ जागा आहेत. कॉंग्रेसचे वादग्रस्त नेते नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणवला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा याच कोकणातला आहे आणि नारायण राणे हे या जिल्ह्यातल्या कुडाळचे आमदार म्हणून २५ वर्षांपासून निवडून येत आहेत. तीन जिल्ह्यातल्या १५ मतदारसंघांपैकी हा एकमेव मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे आणि नारायण राणे कोकणामध्ये मोठा विजय मिळवण्याच्या वल्गना करीत प्रचार करत फिरत आहेत. विरोधी पक्षांनी नारायण राणे हे कोकणाच्या बाहेर पडता कामा नयेत अशी व्यूहरचना केली होती आणि तिच्यात राणे अडकले आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पडूच शकले नाहीत. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ मतदारसंघात ते स्वतः उभे आहेत आणि कणकवली मतदारसंघात त्यांचे चिरंजीव नितेश राणे उभे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा मोठा मुलगा निलेश राणे पराभूत झाला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतसुध्दा त्यांना धोका जाणवायला लागला आहे.

नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले प्रचारप्रमुख आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा काढण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात मात्र ते आपल्या जिल्ह्याच्या बाहेर पडू शकले नाहीत. कारण त्यांना पराभवाची चाहूल लागल्यामुळे स्वतःची सारी प्रतिष्ठा पणाला लावून घराघरात मतांसाठी फिरावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहेत. त्यातल्या दोन मतदारसंघात राणे पिता-पुत्र उभे आहेत. एक मुलगा खासदार होता. राणे यांची ही मक्तेदारी हा निवडणुकीचा विषय झाला आहे. कॉंग्रेसचे कार्यकर्तेसुध्दा या मुद्यावरून त्यांच्याविरोधात गेले आहेत. एकंदरीत त्यांच्या पराभवाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार परशुराम उपरकर हे त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांना आव्हान देऊन शिवसेनेत प्रवेशले. आता त्यांच्यासमोर उपरकरांचे आव्हान तर आहेच परंतु राणे यांचे निकटचे सहकारी राजन तेली हे त्यांच्या विरोधात गेले आहेत आणि ते राणेंेच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून उभे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात एकंदर पाच जागा आहेत. त्यातल्या तीन जागा शिवसेनेकडे आणि दोन जागा राष्ट्रवादीकडे आहेत. भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपापेक्षा शिवसेनेला तिथे जास्त वाव आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर येथे होणार्‍या अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यांचे हे आंदोलन विकासविरोधी आणि अवैज्ञानिक स्वरूपाचे आहे. परंतु लोकांच्या भावना भडकवून मतांचा स्वार्थ साधण्यासाठी शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करायला सुरूवात केली आहे आणि त्याचा रत्नागिरी जिल्ह्यात थोडासा प्रभाव पडला आहे. असे असले तरी या जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघांमध्येच म्हणजे रत्नागिरी आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव जास्त आहे. परिणामी शिवसेनेला दोन आणि भाजपाला दोन जागा मिळतील असा भाजपाचा दावा आहे. कोकणातला तिसरा जिल्हा म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या ७ जागा आहेत. त्यातल्या तीन जागा शेका पक्षाकडे. दोन जागा राष्ट्रवादीकडे. एक जागा शिवसेनेकडे आणि एक जागा कॉंग्रेसकडे होती. परंतु आता कॉंग्रेसचा आमदार भाजपात आला आणि तो भाजपाचा उमेदवार म्हणून उभा आहे. रायगड जिल्ह्यातला शेका पक्षाचा पगडा आता कमी होत आला आहे. शेका पक्ष आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना अस्तित्वाची लढाई द्यावी लागत आहे आणि कोकणातली लढाई प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यातच होते की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.