
महाराष्ट्राच्या उत्तर भागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यांवर भारतीय जनता पार्टीची मोठीच भिस्त आहे. कारण या पाच जिल्ह्यातल्या ४७ जागांमधून किमान २५ जागा भारतीय जनता पार्टीला मिळतील असा या पक्षांच्या नेत्यांचा विश्वास आहे. अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात अनुक्रमे १२ आणि १५ जागा आहेत. जळगाव जिल्ह्यात ११ तर धुळे जिल्ह्यात पाच आणि नंदूरबारमध्ये चार जागा आहेत. या भागावर तसा विचार केला तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे चांगलेच वर्चस्व आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत या वर्चस्वाला मोदी लाटेने चांगलाच तडाखा दिला. या भागातील लोकसभेच्या ८ जागांतील ७ जागा भाजपाला आणि एक जागा शिवसेनेला मिळाली.
उत्तर महाराष्ट्रावर भाजपाची भिस्त
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी १३, शिवसेना १०, कॉंग्रेस ९, भाजपा ६, मनसे ३ आणि अन्य सहा असे पक्षीय बलाबल होते. या बलाबलातून राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत असले तरी राष्ट्रवादीचे नेते मोठ्या संख्येने भाजपात आले असल्याने या वर्चस्वाला मोठा तडा गेलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजयकुमार गावीत हे आपल्या कन्येसह भाजपामध्ये आले आहेत. त्यांची कन्या खासदार म्हणून निवडून आली आहे आणि ते स्वतः विधानसभेला उभे आहेत. उत्तर महाराष्ट्रातले भाजपात आलेले दुसरे राष्ट्रवादीचे मंत्री म्हणजे बबनराव पाचपुते. या दोघांच्या भाजपा प्रवेशामुळे गावीत यांचा नंदूरबार जिल्हा आणि पाचपुते यांचा नगर जिल्हा भाजपामय होण्यास मदत झाली आहे.
पूर्वी भारतीय जनता पार्टीला अस्पृश्य मानले जात होते. पण आता हा पक्ष केंद्रात सत्तेवर आला असल्यामुळे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाराज नेते बिनदिक्कतपणे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे भाजपाचे पारडे जड होत आहे. या उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे वर्चस्व आहे. परंतु वंजारी आणि लेवा पाटील यांना वगळून उत्तर महाराष्ट्राचे राजकारण करता येत नाही. नगर जिल्ह्यात वंजारी समाज आणि नंदूरबार, धुळे व नाशिक या जिल्ह्यातील आदिवासी त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटील हे समाज राजकारणात प्रभावी आहेत. या सार्या जातीय समीकरणांनीसुध्दा भाजपालाच पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे भाजपाला विजयाच्या अपेक्षा आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्चस्वाला लोक कंटाळले आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला त्यांना दिलासा वाटत आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १० जागा मिळालेल्या आणि भाजपाला ६. त्यामुळे भाजपाचे बळ शिवसेनेपेक्षा कमी आहे असे दिसते. विशेषतः सुरेश जैन हे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे आधारस्तंभ आहेत. आता सुरेश जैन हे घरकुल भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. अडीच वर्षांपासून त्यांची तुरुंगवारी जारी आहे. परंतु राजकीय वजन असलेले मंत्री म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन अडीच वर्षांत जामीन मिळवू शकले नाहीत. आता त्यांनी तुरुंगातून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि एक नवे आव्हान स्वीकारले आहे. परंतु त्यांची तुरुंगवारी, त्यांच्यावरचे आरोप यामुळे त्यांना चांगली मते मिळण्याची आशा दुरावली आहे. छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आधारस्तंभ. त्याचबरोबर गुलाबराव देवकर, विजयकुमार गावीत हेही राष्ट्रवादीचेच नेते. देवकर आता तुरुंगात आहेत आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे अमाप आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाशिक जिल्ह्यात लोकांचा पाठिंबा मिळण्याची कमी शक्यता आहे. विजयकुमार गावीत यांचा आदिवासी समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या भागात ३५ टक्के एवढ्या प्रमाणात असलेला हा समाज भाजपाकडे आकृष्ट झाला आहे. त्याचा फायदा भाजपाला होईल.
नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आहे. नाशिक जिल्हा हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु मनसेला महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे पहिली दोन वर्षे भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ता राबवली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौर पदाची निवडणूक जाहीर होताच भाजपाने मनसेचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी, मनसे अल्पमतात आली. आता बहुमत टिकवण्यासाठी मनसेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे हात पसरवावा लागला. ज्यांच्यावर टीका केली त्यांचाच पाठिंबा घेऊन मनसेने नाशिकमधली सत्ता टिकवली आहे. या त्यांच्या राजकीय संधिसाधूपणामुळे आणि नाशिकमध्ये ते काहीच करू शकले नाहीत म्हणून या पक्षाची या भागातली प्रतिमा मलीन झाली आहे. मनसेला या भागातून गेल्या निवडणुकीत तीन जागा मिळाल्या होत्या. परंतु या वेळेस तेवढ्याही मिळण्याची शक्यता नाही.
