
वर्धा – हिंगणघाट मतदार संघात भाजपच्यावतीने रितसर परवानगी न घेता परस्पर प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रकरणी समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करुन अटक केली. नंतर जामिनावर सोडून दिले. सदर रॅलीत भाजप उमेदवारही सहभागी होता. पोलिसांनी उमेदवारासह सर्वांना ठाण्यात नेले. मात्र उमेदवाराला सोडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचे बोलले जात आहे. या घटनेने हिंगणघाट मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. गिरड येथे भाजप उमेदवाराने कोणतीही परवानगी न घेता प्रचार रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून उमेदवार गृहभेटी देत होता. अशातच ही रॅली बसस्थानक चौकातून पुढे जात होती. रॅलीसाठी आचारसंहितेतील कलमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र सदर रॅलीची कुठलीही परवानी घेण्यात आली नसल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. यानंतर तत्काळ गिरडचे ठाणेदार ओमकांत चिंचुळकर यांनी ताफ्यासह रॅलीला अडवून वाहनासह उमेदवार व कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले. यानंतर कारवाईला सुरुवात झाली. सुमारे तीन तासांनी कारवाई पूर्ण झाली. या कारवाईत मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी रॅलीतील १२ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र रॅलीच्या माध्यमातून उमेदवार स्वत: प्रचार करीत असतानाही पोलिसांनी केवळ ताकीद नोटीस देऊन सोडून दिले. आचारसंहितेच्या काळात पोलिसांनी पक्षपाती कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
