
अमरावती – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राज्यात भाजपने पाळेमुळे रोवली. मात्र; संधी मिळताच सत्तेसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांपूर्वीची युती तोडली. त्यामुळे जे भाजपवाले बाळासाहेबांचेच झाले नाहीत, ते मुस्लिमांचे कदापिही होणार नाहीत, अशी खरमरीत टीका उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर येथील काँग्रेसचे नेते इमरान मसूद यांनी अमरावती येथे केली. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुस्लिमांचे काय होणार ?
इमरान मसूद यांनी आपल्या भाषणातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान मोदी हे मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप केला. मुजफ्फरनगर येथे जातीय दंगली घडविण्यात अमित शाह यांचाच हात होता. त्यावेळी मुस्लिमांना ईद साजरी करु देणार नाही, असा फतवा अमित शाह यांनीच काढला होता. मात्र, उत्तरप्रदेशातील काही हिंदू बांधवांच्या मदतीने मुस्लिमांनी ईद साजरी करुन शहांना उत्तर दिल्याचे ते म्हणाले. भाजप आणि संघ परिवार मुस्लिमांना संपविण्याचे कटकारस्थान रचत आहेत. मुस्लिम समाज धर्मांधशक्तींना कधीही खतपाणी घालणार नाही, हे सांगताना येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपवाले आता मदरशात आतंकवादी प्रशिक्षण देत असल्याचा आरोप करीत आहेत. परंतु मोदींनी देशभरातील कोणत्याही मदरशाची तपासणी करावी, तसे काही आढळल्यास मुस्लिम जबाबदार राहतील, असे ते म्हणाले. मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेणार्या संघ परिवारातील एकाने तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ़यात योगदान दिले काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिमच आघाडीवर होते. संघ परिवार केवळ ब्रिटिशांशी हातमिळवणी करण्यात मश्गुल होता, असा आरोप त्यांनी केला. भाजपकडे महापुरुष नाहीत, त्यामुळे ते काँग्रेसकडे असलेले महापुरुष उसने घेत असून नरेंद्र मोदी हे महापुरुषांच्या नावे विविध योजना सुरु करीत आहेत. भाजप किंवा संघ परिवारात एक तरी बलिदानाचा चेहरा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. मोदी यांनी खोटं बोलून देशाची सत्ता हस्तगत केली. मात्र, त्यांना आता झाडू हाती घेण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या मोहापायी शिवसेनेशी दगाबाजी केली. शिवसेनाच काय? रामाशीसुद्धा गद्दारी केली. सत्ता येताच रामाला विसरलेत. ज्या भाजपने देवाशी गद्दारी केली, ते मनुष्याचे काय होतील? असे मसूद म्हणाले. भाजपच्या दुटप्पी धोरणापासून सावध राहून मुस्लिमांनी धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षाच्या उमेदवारांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
