
नागपूर – जनतेचे अच्छे दिन येणार, अशा थापा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भाजपने ठोकल्या. त्यावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली. मात्र, मोदी शासनाने जनतेच्या हिताविरुद्ध निर्णय घेण्याचा सपाटा सुरु केला असून, देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे मोदींच्या अच्छे दिन येणार या वल्गना हवेतच विरल्या, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या विधानसभा उमेदवारांच्या प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जनतेचा विश्वासघात केंद्र सरकारने केला : शरद पवार
अच्छे दिन आले कोणाचे? असा सवाल करून पवार म्हणाले की, मोदी शासनाने शेतकर्यांना मिळणारे अनुदान बंद केले. शेतमाल निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. यालाच अच्छे दिन म्हणायचे काय, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात महागाई वाढली, असा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र, या महागाईचे चटके गरिबांना बसू नये यासाठी अन्नसुरक्षा योजना सुरु केली. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ गरिबांना दिले. तसेच रोहयोच्या माध्यमातून रोजगाराची हमी दिली. ही दूरदृष्टी त्या सरकारची होती. मात्र, मोदी सरकार लोकोपयोगी असणार्या या योजना बंद करण्याच्या विचारात असून आता बुरे दिन येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
