मोदींची परदेशवारी यशस्वी, भारतात होणार ९५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

modi1
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यावरून अनेक राजकीय विरोधकांकडून टीकेचे झोड उठविण्यात येत होते. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यास केलेली विनंती यशस्वी ठरली असून येत्या तीन वर्षांत देशात ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कळते. यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल या संस्थेने याबाबत माहिती दिली. तसेच याशिवाय जपान ३४ अब्ज डॉलर, चीन २० अब्ज डॉलर भारतात गुंतवणूक करणार असल्याचे कळते. यावरूनच ‘अच्छे दिन आने वाले है…’असे म्हणायला हरकत नाही.

भारत-अमेरिका यांच्यातील बैठक द्विपक्षीय संबंध वेगळ्या आणि वरच्या पातळीवर नेऊन ठेवणारा राहिला आहे. मोदी यांची ही भेट दोन्ही देशांतील सर्व समीकरणे बदलवणारी ठरल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच देशाच्या विकासासाठी भारत-अमेरिका यांच्यात झालेला करार हा देश विकसित करण्यासाठी भारताने उचललेले पहिले पाऊल असल्याचेही बोलले जात आहे.’अमेरिकेकडून झालेली गुंतवणुकीची घोषणा त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या गुंतवणुकीच्या केवळ २० टक्केच आहे. केंद्रातील स्थिर सरकार आणि गुजरातप्रमाणेच देशाचा कायापालट घडविण्याची मोदींची असलेली क्षमता अमेरिका जाणून आहे. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणुक करण्याबाबत मोदींना ग्वाही दिली आहे.