भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचाही थ्रीडी प्रचार सभा!

ncp
मुंबई – लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपने नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभा थ्रीडी स्वरूपात प्रसारित केली होती. त्याचा मोठ्याप्रमाणात भाजपला फायदा झाल्याचेही दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपचे १०० हून अधिक हॉलोग्राफिक ट्रक फिरणार आहेत. तसेच युती आणि आघाडी तुटल्यानंतर भाजपसोबत स्पर्धेत असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील निवडणुकीची रणनिती आखली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा भाजपच्या पावलावर पाऊल टाकत थ्रीडी प्रचार सभा दाखविणारे २५ ट्रक पक्षाने तयार केले आहेत. या थ्रीडी हॉलोग्राफिक ट्रक्सच्या माध्यमातून भाजपच्या राज्यभरात एक हजार तर राष्ट्रवादीच्या ६०० सभा होणार आहे.

निवडणुकीच्या प्रचार सभेत हॉलोग्राफिक ट्रक्ससाठी आरटीओची विशेष परवानगी घ्यावी लागते. सुरुवातीला आरटीओने राष्ट्रवादीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, भाजपच्या १०० ट्रकना परवानगी देण्यात आली असेल, तर राष्ट्रवादीच्या ट्रकना कोणत्या कारणास्तव परवानगी नाकारली जात आहे, याचे लेखी कारण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्यानंतर ही परवानगी देण्यात आल्याचे कळते. भाजपच्या दिल्ली किंवा राज्यातील एकाही नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी होत नाही. मात्र, मोदींची सभा म्हटल्यावर लोकांची एकच गर्दी जमते. त्यामुळे मोदींमुळे निवडणुकीत खूप फायदा घेऊ शकतो, असे मत भाजपच्या उमेदवारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघांत मोदींची सभा व्हावी, यासाठी अनेक उमेदवारांचा आग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये या ट्रक्सद्वारे मोदींच्या थ्रीडी प्रचाराचा धडाका लावण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारात मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारकिर्दीत शेतीमालाचे पडलेले भाव आणि शरद पवार केंद्रात मंत्री असताना शेतकऱ्यांना मिळालेले बाजारभाव याची तुलना प्रामुख्याने करणार असल्याचे समजते.