नितीन गडकरीनंतर आठवलेंनीही पुन्हा ‘युती’ होण्याचे दिले संकेत!

athavale
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना युती तुटल्यानंतर सत्ता स्थापन करण्याइतकं बहुमत जर भाजपला मिळालं नाही तर आम्ही शिवसेनेला सोबत घेऊ असं म्हणत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले. गरज पडल्यास निवडणुकीनंतर शिवसेनेशी पुन्हा युती करू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर आता रामदास आठवलेंनीही शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे म्हटले आहे. ते काल विक्रोळीमध्ये रिपाइं उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

महायुती तुटल्यानंतर आठवले भाजपसोबत युती करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण बहुमत मिळाले नाही तर शिवसेनेलाच जवळ करण्याचे संकेत त्यांनी दिले. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनीही एका मुलाखतीत निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे बहुमताचा आकडा प्राप्त करण्यासाठी भाजप-सेना युती पुन्हा एकदा एकत्र येणार यावर अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र शिवसेनेच्यावतीने अद्याप याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment