
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या त्यांच्या अमेरिकेच्या दौर्यात भारतीय संस्कृतीचे भान ठेवले आहे. त्यांचा हा दौरा नवरात्रात झाल्यामुळे आणि ते नवरात्रात उपवास करत असल्यामुळे त्यांच्या त्या उपवासाला आणि भक्तीला सुद्धा उगाचच एक आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले आहे. त्यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर त्यांना भगवद्गीता भेट दिली हे त्यांचे वैशिष्ट्य होय. नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना भगवद्गीतेची कोणती प्रत दिली आहे याला महत्व आहे. बाजारात उपलब्ध असलेली उगाच कुठली तरी एक भगवद्गीतेची प्रत उचलली आणि ओबामा यांना दिली आहे असे घडलेले नाही. तर महात्मा गांधी यांनी गीतेचा अन्वयार्थ लावणारा ग्रंथ लिहिला आहे तो त्यांनी ओबामांना दिला आहे. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघ हा महात्मा गांधीचा मारेकरी, त्यांचा विरोधक असल्याचा प्रचार नेहमीच कॉंग्रेसवाल्यांकडून केला जात असतो. परंतु या सगळ्या कुचाळक्या करणार्या लोकांना संघाच्या शाखेवर आणि व्यवहारात महात्मा गांधींचे नेमके स्थान काय हे माहीत नाही.
गांधी, मोदी आणि गीता
संघ गांधींच्या विरोधात नव्हता आणि नाही आणि म्हणूनच संघाच्या शाखेवर नित्य म्हटल्या जाणार्या प्रात:स्मरणामध्ये पुरातन काळापासून आजपर्यंतच्या ज्या ज्या भारतीय महापुरुषांची नावे घेऊन त्यांना वंदन केले जाते त्यात महात्मा गांधींचे नाव आहे. संघाचा महात्मा गांधींच्या मुस्लीम अनुनयाला केवळ विरोध होता. गांधींना विरोध नव्हता आणि तीच भावना प्रकट करत नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना महात्मा गांधींनी समीक्षण केलेली भगवद्गीतेची प्रत भेट दिली आहे. कारण स्वत: बराक ओबामा हे सुद्धा महात्मा गांधींचे चाहते आहेत आणि तेही अनेक वेळा गांधींच्या नावाचा उल्लेख करत असतात. मोदी यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या भाषणांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. परंतु आपल्याला छोट्या माणसांसाठी मोठी कामे करायची आहेत हे त्यांचे वाक्य अमेरिकेतल्याही खासदारांना फार प्रभावित करून गेले. मोदी यांनी आपल्या भाषणांनी अमेरिका गाजवून टाकली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व समोरच्या माणसाला भारावून टाकणारे आहे. त्याचा फायदा भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या मालिकेत पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी या तिघांच्या व्यक्तिमत्वांचा असाच प्रभाव पडत असे. यापैकी कोणाचीही कोणाशी बरोबरी करण्याचे काही औचित्य नाही.
प्रत्येकाच्या प्रभावाची तर्हा वेगळी होती. पंडित नेहरू हे प्रदीर्घकाळ पंतप्रधान होते. ते पंतप्रधान होण्याच्या कमीत कमी पंधरा वर्षे आधी ते कधी ना कधी तरी पंतप्रधान होणार हे सगळ्या जगाने जाणलेले होते. पंडित नेहरूंचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मोठा व्यासंग होता. त्यामुळे त्यांनी जागतिक राजकारणाला वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना त्यात बर्यापैकी यश सुद्धा आले. वाजपेयींच्या बाबतीत सुद्धा ते कधी ना कधी पंतप्रधान होणार असे बोलले जात होते. त्यांनी सुद्धा परराष्ट्र व्यवहार खात्यामध्ये मैलाचा दगड ठरावेत असे अनेक निर्णय घेतले. इंदिरा गांधी यांचे सळसळते व्यक्तिमत्व आणि धाडसी निर्णय यामुळे त्यांनीही आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या नावाचा एक शिक्का उठवला. विशेषत: पाकिस्तानचे विभाजन करून बांगला देश हा नवा देश निर्माण केला. खरे म्हणजे मनमोहनसिंग हे सुद्धा प्रदीर्घकाळ पंतप्रधानपदावर राहिले, पण भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यांच्या नावापुढे सर्वात दुबळे पंतप्रधान असा उल्लेख केला जाईल. पी.व्ही. नरसिंह राव हेही पाच वर्षे पंतप्रधान होते आणि त्यांनी देशाच्या अर्थकारणाला चांगलीच दिशा दिली, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांना फार काही छाप पाडता आली नाही.
या मालिकेमध्ये नरेंद्र मोेदी हे जगाच्या राजकारणावर आणि परराष्ट्रीय व्यवहारावर चांगली छाप पाडणारे पंतप्रधान म्हणून नक्कीच आपले नाव कोरतील असे त्यांच्या अमेरिकेतल्या दौर्याकडे पाहिल्यानंतर खात्रीने वाटते. पंडित नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी अमेरिका, रशिया, चीन या देशांना भेटी दिल्या होत्या, तेव्हा तिथे त्यांनी जशी छाप पाडली होती आणि त्यांचे जसे स्वागत झाले होते तसेच नरेंद्र मोदींचे अमेरिकेत झाले आहे. नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून अमेरिकेत जायचे होते, परंतु २००२ सालच्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला. पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांना आदराने निमंत्रण दिले. खरे म्हणजे अमेरिकेची मस्ती जिरली आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी किंवा गेल्यानंतर या मुद्यावरून अमेरिकेला कधी खिजवले नाही. त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वातला भारदस्तपणा, परिपक्वता आणि मुत्सद्देगिरी लक्षात येते. त्याचबरोबर त्यांचा उदार स्वभावही दिसून येतो. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी कसलीही कटुता न दाखवता तिथल्या लोकांमध्ये मिसळून जाऊन अशी काही भाषणे केली आहेत की, अनिवासी भारतीयांबरोबरच कित्येक अमेरिकन राजनेते सुद्धा मोदींचे फॅन होऊन गेले आहेत.
