
मनसे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडताना शिवसेनेलाच लक्ष्य केले. त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा अपरिहार्य परिणाम आहे. ते शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेनेवर टीका करणे साहजिक होते, कारण त्यांचे शिवसेनेशी काही मतभेद होते आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेला शेवटचे जय महाराष्ट्र म्हटले होते. तेव्हा बाहेर पडल्यानंतरच्या वर्षभरात त्यांनी शिवसेनेची चर्चा केली असती तर ते ठीक होते. पण आता त्यांनी टीका करायला शिवसेनाच सापडली हे दुर्दैव आहे. कारण त्यांना आता कॉंग्रेसवर टीकाच करता येत नाही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही नकला करता येत नाहीत. कारण त्यांच्या कृपाशिर्वादावर मनसेच्या हातातली एकुलते एक नाशिक महापालिका टिकली आहे. तेव्हा आता शिवसेनेलाच लक्ष्य केलेले बरे असे ठरवून ते काल शिवसेनेवर बरसले. राज ठाकरे यांनी काल आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानिमित्ताने झालेल्या सभेत नेहमीप्रमाणे ते मोठ्या प्रमाणावर नकारार्थीच बोलले. त्यांच्याकडे स्वत:चा काही कार्यक्रम नाही.
राज ठाकरे यांचा हितोपदेश
त्यांनी ब्ल्यू प्रिंट नावाचा एक प्रकार तयार केला आहे. परंतु ती ब्ल्यू प्रिंट पाहिल्यानंतर तो महाराष्ट्राच्या विकासाचा नकाशा आहे की, शालेय निबंध स्पर्धेतला निबंध आहे हेच कळत नाही, इतका तो शाळकरी दर्जाचा आहे. मनसेच्या या ब्ल्यू प्रिंटमुळे कोणाच्याही माहितीत काही भर पडण्याची शक्यता नाही. कारण त्यात नवीनही काही नाही आणि त्या ब्ल्यू प्रिंटला व्यवहाराचा, अनुभवाचा कसलाच आधार नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा ब्ल्यू प्रिंट काढण्याऐवजी आपल्या गेल्या दहा वर्षातल्या राजकीय वाटचालीच्या आधारावर भावी वाटचालीचा ब्ल्यू प्रिंट काढला असता तर बरे झाले असते. निदान स्वत: आपण कोठे आहोत आणि कसे दिशाहीन वाटचाल करत आहोत एवढे तरी त्यांना कळले असते. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काही सभा घेतल्या आणि मुळातच अध्ययन, चिंतन, मनन, अनुभव काही नसल्यामुळे त्यांना पुढे पुढे सभेत नेमके काय बोलावे हा प्रश्न पडला आणि त्यांनी एके ठिकाणी काहीच सुचत नसल्यामुळे सभाच रद्द करून टाकली. नाही तरी त्याच त्या नेत्यांच्या नकला किती दिवस करत बसणार? ताजा विषय मिळाल्यास मात्र राज ठाकरे काही तरी बोलतात. त्यांना काल शिवसेनेचा विषय मिळाला. शिवसेनेने भाजपासमोर लाचारी केली, बाळासाहेब हयात असते तर त्यांनी भाजपाच्या नेत्यांना लाथ घातली असती असे राज ठाकरे म्हणाले.
प्रत्यक्षात शिवसेनेने भाजपासमोर लाचारी तर केलेली नाहीच, परंतु राजकारण सुलभ अशी नम्रता सुद्धा दाखवली नाही. त्यामुळे युती तुटली आहे हे सगळ्यांना माहीत आहे. शिवसेनेने भाजपासमोर लाचारी केली असे राज ठाकरे यांना कोणत्या घटनेवरून वाटते हे काही त्यांनी नमूद केलेले नाही. आता त्यांच्यासमोर टीका कोणावर करावी हा प्रश्न उभा राहिलेला आहे. भाजपावर टीका करावी तर त्याचा विपरीत परिणाम होतो, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करावी तर नाशिक महापालिकेचे घोंगडे या दोन पक्षात अडकलेले आहे. तेव्हा राहता राहिली शिवसेना. शिवसेना आणि भाजपाची युती मोडली हे एक निमित्त करून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. पण त्यामध्ये वास्तवता तर नाहीच, पण उलट स्वत: राज ठाकरे मात्र नाशिक महानगरपालिकेतले आपले बहुमत टिकावे म्हणून कॉंग्रेस पक्ष आणि छगन भुजबळ यांच्यासमोर केवळ लाचारच नाही तर दीन होऊन हात जोडून उभे आहेत. आपण लोकांवर लाचारीचा आरोप करतो तेव्हा तसाच आरोप आपल्यावर होऊ नये एवढे तरी आपले चारित्र्य स्वच्छ असावे एवढीही दक्षता राज ठाकरे यांना घेता आलेली नाही.
ते स्वत: सत्तेसाठी लाचार झालेले आहेत आणि दुसर्याच्या अंगावर शिंतोडे उडवत आहेत. बरे, राज ठाकरे यांच्या या लाचारीची कथा फार जुनी असती आणि लोक ते विसरलेले आहेत अशी स्थिती असती तर राज ठाकरे यांचा शिवसेनेवरचा आरोप खपून गेला असता. पण त्यांच्या नाशिकमधल्या लाचारीचे प्रकरण इतके ताजे आहे की, त्याला अजून पंधरवडा सुद्धा उलटलेला नाही. शिवसेनेने भाजपाशी वाटाघाटी केल्या, त्यात दोघांचे जमले नाही. ही काही लाचारी नव्हे. सत्तेसमोर नतमस्तक होणे आणि आपली तत्वे गुंडाळून ठेवून स्वार्थ साधणे याला लाचारी म्हणता येईल. शिवसेनेने वाटाघाटीत तर वरदहस्त ठेवला होता. १५० पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, असा शिवसेनेचा बाणाच होता. हा बाणा लाचारीशी नेमका विरुद्ध होता. तिथे कोणी कोणाला लाथाडायचे नसते. पण राज ठाकरे यांना तसे अपेक्षित असेल तर त्यांनी अशा प्रकारची लाथाडणी त्यांच्या जवळ येणार्या कोणत्याही पक्षाशी करावी, पण शिवसेनेला शहाणपणा शिकवू नये. राजकारण म्हणजे एक घाव दोन तुकडे नसते. लवचिकता, तडजोड, संयम हे राजकारणातले आवश्यक गुण असतात. लाचारी न करता सुद्धा हे गुण दाखवता येतात. सतत लाथाडण्याच्या आणि काडीमोडाच्या चर्चा करणे म्हणजे राजकारण नव्हे आणि स्वाभीमान सुद्धा नव्हे. राजकारणातले हे गुण ज्याच्या अंगी नसतील तो कोणत्याच राजकारणात यशस्वी होत नाही आणि तशा अपयशी नेत्याचे उदाहरण म्हणजे स्वत: राज ठाकरे हेच आहेत.
