
मुंबई – मुख्य पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी जागावाटपतच गुंतलेले असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांनी आरपीआयच्या आठवले गटाकडून चेंबूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
आठवलेंच्या परस्पर निकाळजेंचा उमेदवारी अर्ज दाखल
दीपक निकाळजेंनी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन केले. जागावाटपाबद्दल महायुतीचा कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे साहजिकच महायुतीतील मित्रपक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार हेही निश्चित नाही. पंरतू, निकाळजेंनी रिपाईंमधून उमेदवारी जाहीर करत, चेंबूरमधून अर्जही दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रिपाईचे मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे हे सुद्धा उपस्थित होते.
पक्ष आदेशानेच अर्ज भरत असल्याचे निकाळजेंनी यावेळी म्हटले आहे. शिवाय रिपाईंला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत, तर स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट प्रतिपादनही निकाळजेंनी केले आहे. दरम्यान, निकाळजेंनी परवानगीशिवाय अर्ज दाखल केल्याचा दावा आठवलेंनी केला आहे.
