दहशतवाद संपेल का ?

obama
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या देशावर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्मृतिदिन साजरा करताना इराकमधील आयएसआयएस या संघटनेचे कंबरडे मोडण्यासाठी इराकवरील हल्ले वाढवले जातील असे जाहीर केले. या मार्गाने आपण दहशतवाद संपवून टाकू असा निर्धार त्यांनी केला आहे. पण अमेरिकेच्या अशा प्रयत्नांनी दहशतवाद असा संपेल का असा मूलभूत प्रश्‍न आहे. अमेरिकेवर तो २००१ सालचा हल्ला झाल्यावर अमेरिकेने काही उपाय योजिले पण ते उपाय काही मूलगामी नव्हते त्यामुळे ओसामाला ठार केले तरीही दहशतवाद जिवंत आहे. म्हणूनच ओबाा यांना याच हल्ल्याच्या स्मृतिदिनाला पुन्हा तीच प्रतिज्ञा करावी लागते. याचा अर्थ माणसे मारून दहशतवाद संपत नाही. दहशतवादच काय पण कोणताही बरा वाईट विचार हा माणसाचा प्राण घेतल्याने संपत नाही.
दहशतवादाचे मूळ शोधून त्यावर आघात केला जात नाही नोपर्यंत दहशतवाद संपण्याची आशा धरता येत नाही.

जगातल्या दहशतवादी संघटना दहशतवादी कारवाया करतात, पण भूभाग जिंकून घेऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या कारवाया छुप्या असतात. आयएसआयएसने मात्र इराक आणि सीरियाचा मोठा भूभाग ताब्यात घेतलेला आहे. एवढेच नव्हे तर दोघा अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद करून वध केला आहे. या हत्या सुरू असतानाचे चित्रण करून ते चित्रण जगभर फेसबुकवरून वितरित केले आहे. अतिरेकी संघटनेची ही एवढी मजल म्हणजे इराक आणि सीरियामध्ये अमेरिकेच्या अब्रूवर घाला घातला आहे. ९/११ ला अमेरिकेवर अल् कायदाचा हल्ला झाला होता, तेव्हापासून अमेरिकेने दहशतवाद विरोधी कारवायांसाठी उचल खाल्ली. जगातला आजचा दहशतवाद अमेरिकेसह सर्व प्रगत जगाच्या अर्थकारणातून जन्माला आलेला आहे. तेव्हा दहशतवाद्यांना संपविण्याच्या वल्गना करतानाच बराक ओबामा, त्यांचे अमेरिकी प्रशासन आणि तथाकथित दहशतवादविरोधी मोहिमेतील ते ३६ प्रगत देश यांनी कधी तरी दहशतवादाच्या मुळाला हात घालण्याचा प्रयत्न करावा. तसा केला नाही तर दहशतवाद्यांच्या कारवायाही चालू राहतील. ही मूलगामी उपाययोजना म्हणजे नेमके काय? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांनी या निमित्ताने दुसर्‍या एका नरेंद्राची आठवण केली आहे आणि ते नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा संदेश ऐकला असता तर अमेरिकेवर ९/११ चा हल्ला झालाच नसता. किंबहुना जगभरात आज सुरू असलेला दहशतवादी संघटनांचा उच्छाद बघण्याची आणि अनुभवण्याची पाळी आपल्यावर आलीच नसती.

यावेळी नरेंद्र मोदी यांना स्वामी विवेकानंदांची आठवण का झाली हीही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अमेरिकेवरचा हल्ला ११ सप्टेंबरला झालेला आहे आणि १८९३ साली याच तारखेला स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत त्यांचे ते तीन मिनिटांचे इतिहासात अमर ठरलेले भाषण केले होते. हा कदाचित योगायोग असेल, परंतु तो योगायोग फार सूचक आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी ओसाबा बिन लादेनच्या प्रेरणेने काही धर्मवेड्या तरुणांनी अमेरिकेच्या आर्थिक मस्तीची निशाणी असलेले वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे दोन स्तंभ विमानांच्या धडका मारून मोठ्या हिंसात्मक पद्धतीने उद्ध्वस्त केले. परंतु १८९३ साली स्वामी विवेकानंद नावाच्या २९ वर्षाच्या तरुणाने एकट्यानेच मोठ्या अहिंसक पद्धतीने केवळ आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर अमेरिकेच्या बौद्धिक अहंकाराचे स्तंभ उद्ध्वस्त केले होते. अमेरिकेसारख्या बड्या, सुधारलेल्या श्रीमंत देशाला भारत ज्ञान शिकवू शकतो हे विवेकानंदांनी सिद्ध करून दिले होते. त्यामुळे त्या भाषणाचा आपल्याला अभिमान वाटतो. परंतु त्याचे काही तपशील अज्ञात आहेत.

स्वामीजींनी आपले भाषण सुरू केले आणि ते तीन मिनिटे होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी अमेरिकेतील बंधू-भगिनींनो असे संबोधन करताच टाळ्या वाजायला लागल्या. नंतरही या भाषणात दोन वेळा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत गेला. तीन मिनिटाच्या भाषणातील पाच मिनिटे टाळ्यातच गेली आणि स्वामीजींचे भाषण सुरू असतानाच बारा वाजले. सभागृहाच्या समोर असलेल्या एका मोठ्या घड्याळात बाराचे टोल पडायला सुरूवात झाली. सावकाशीने झालेल्या त्या टोलांमध्येही एक मिनिट गेला. तोपर्यंत स्वामीजी शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले, आता माझ्या समोरच्या या घड्याळात जी घंटा वाजली आहे ती जगातल्या समस्त धर्मवेडेपणाची मृत्यूघंटा ठरावी, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. अशारितीने त्यांनी अतीशय कल्पकतेने आपल्या भाषणाचा शेवट केला. स्वामीजींनी या ठिकाणी धर्मवेडेपणाची मृत्यूघंटा वाजावी अशी सदिच्छा व्यक्त केली. पण जगातला धर्मवेडेपणा कमी होण्याऐवजी अधिक वाढत चालला आहे आणि त्यातूनच दहशतवाद निर्माण झाला आहे. सगळेच धर्म सारखे असतात. प्रत्येक धर्म म्हणजे एकाच परमेश्‍वराला प्राप्त करण्याचा वेगवेगळा मार्ग असतो हे स्वामीजींचे म्हणणे होते. हिंदू धर्माचे ते महत्वाचे तत्व आहे. पण त्याचा जगाला विसर पडला आहे म्हणून बराक ओबामासारख्या नेत्यांना दहशतवादाचा खातमा नेमका कसा करायचा हे कळत नाही.