
टोकियो – पाच दिवसांचा जपान दौरा आटोपून भारतात येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत ते नवी दिल्लीत पोहचण्याची शक्यता आहे.
आज संध्याकाळपर्यंत नरेंद्र मोदी येणार मायदेशी
मोदींना भारतातील विविध विकास प्रकल्पांसाठी पुढल्या पाचवर्षात ३५ अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन या दौ-यात जपानने दिले असून भारत आणि जपान दोन्ही देशांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण करार या दौ-यात झाले आहेत.
जपान बरोबरचे व्दिपक्षीय आणि मैत्री संबंध अधिक दृढ करुन संरक्षण, नागरी अणूऊर्जा, व्यापार, आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत जपानी गुंतवणूक आणणे हा या दौ-याचा मुख्य उद्देश होता.
क्योटोपासून मोदींच्या जपान दौ-याला सुरुवात झाली होती. क्योटोच्या धर्तीवर वाराणसीचा अध्यात्मिक आणि स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासंबंधी महत्वपूर्ण करार या दौ-यात झाला आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा स्वत:चा लोकसभा मतदारसंघ आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा दक्षिण आशिया बाहेरचा हा पहिलाच परदेश दौरा होता.
