
मुंबई : मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा ४६ प्रिमियम ट्रेन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे बंद करणार एसी डबल डेकर, शताब्दी
याबाबत कोकण रेल्वेने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले असून २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर्पयतच्या आकडेवारीनुसार, शताब्दी ट्रेन ४,६३५ तिकिटे, एसी डबल डेकरची ८,६४० तिकिटे, एसी आरक्षित ट्रेनची १,३३० तिकिटे उपलब्ध आहेत. कमी प्रतिसाद मिळत असल्याने या तिन्ही ट्रेनच्या फेऱ्या मागे घेण्यात येतील, असे यामध्ये म्हटले आहे.
रत्नागिरी-एलटीटी विशेष ट्रेन सोडण्यात आली. मात्र या ट्रेनला येताना केवळ १२५ प्रवासी, तर जाताना केवळ २८२ प्रवासी मिळाले. कमी प्रतिसादामुळे १ सप्टेंबरपासून ही ट्रेन बंद करण्यात येणार आहे, असे कोकण रेल्वेच्या माहिती जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
