मातोश्रींवर येण्याचे अमित शहांना आमंत्रण

shah
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटीसाठी येण्याचे आमंत्रण दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र शहा मातोश्रीवर जाणार की नाही याबाबत भाजपने कोणतेही भाष्य करण्याचे टाळले आहे.

महाराष्ट्रात आक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज मुंबई भेटीवर येत आहेत. भाजपने या निवडणुकांसाठी राज्यात जादा जागांवर हक्क सांगितला आहे. युतीच्या जागावाटपावर अद्याप कोणतीही बोलणी झालेली नाहीत. मुंबईत अमित शहा यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना निमंत्रण दिले असले तरी ते मातोश्रीवर जातील की नाही याबाबत कांहीच खुलासा होऊ शकलेला नाही.

भाजपचा जादा जागांचा आग्रह आणि सेनेचा हेका यामुळे युती जागावाटपाबाबत पेच निर्माण झाला आहे. भाजपचे राज्यातील प्रमुख नेते शहा यांनी मातोश्रीवर जाऊ नये या मताचे आहेत. सेना जादा जागा देण्यास जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत शहा यांनी उद्धव ठाकरे यांची गाठ घेऊ नये असाही आग्रह या नेत्यांनी धरला आहे. आजपर्यंत भाजप सेना युतीत भाजपचे वरीष्ठ नेते जेव्हा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट आवर्जून घेतली आहे. आता अमित शहा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे अनुभवास येत आहे.

Leave a Comment