
इराक आणि सिरीयाच्या कांही भागात स्थापन झालेल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एका अमेरिकी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या सुटकेसाठी ४० कोटी रूपयांची खंडणी मागितली आहे तसेच अमेरिकेच्या कैदेत असलेल्या न्यूरॉलॉजिस्ट आफिया सिद्दीकी यांना सोडून द्यावे अशीही मागणी केली आहे.
आयएसआयएसने अमेरिकी महिलेला केले बंधक
या संटनेनेकडून अमेरिकी पत्रकार जेम्स फोले याचा नुकताच शिरुच्छेद करून त्याचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. त्याचवेळी बंधक बनविलेल्या दुसर्या पत्रकाराचा शिरच्छेद करण्याची धमकीही देण्यात आली आहे. आता बंधक बनविलेली महिला २६ वर्षीय असून तिला गतवर्षीच सिरीयातून ताब्यात घेतले गेल्याचे आयएसआयएस ने जाहीर केले आहे. या महिलेच्या परिवाराने सुरक्षेच्या कारणास्तव तिचे नांव जाहीर केले जाऊ नये अशी विनंती केली असल्याने तिचे नांव जाहीर केले गेलेले नाही.
फोले याला बंधक बनविल्यानंतरही त्यांच्या सुटकेसाठी या संघटनेने १३२ दशलक्ष डॉलर्सची खंडणी आणि न्यूरोसर्जन सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र आफियाच्या परिवाराने त्यांच्या मुलीची अमेरिकी तुरूंगातून सुटका व्हावी अशी त्यांचीही इच्छा असली तरी या दहशदवादी संघटनेशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर अशी वेळ कुणाच्याही मुलीवर अथवा बहिणीवर येऊ नये अशी इच्छाही व्यक्त केली आहे.
