
नारायण राणे कॉंग्रेसमध्ये तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. कॉंग्रेसला मुख्यमंत्रिपदाला योग्य नेता सापडत नाही त्यामुळे तिथे आता आपलीच गरज आहे असा त्यांचा भ्रम होता. पण त्यांना मुख्यमंत्री केले नाही. त्यामुळे ते तडफड करायला लागले आणि त्याच तडफडीत त्यांनी गेली नऊ वर्षे पक्षात अनेकदा गडबडी केल्या आहेत. आपल्याला वचन देऊनही मुख्यमंत्री केले नाही याची कटुता मनात ठेवूनच ते या पक्षात वावरत असतात आणि सतत काही तरी विक्षिप्तपणा करीत असतात. विलासराव यांना राणे यांच्या काही विधानांबाबत विचारणा केली असता त्यांनी, नारद मुनींच्या आवाजात, केवळ ‘नारायण नारायण’ असे उद्गार काढले. त्या आविर्भावात राणे या व्यक्तीविषयीची योग्य ती टिप्पणी होती. त्यातून राणे यांचे जे व्यक्तिमत्त्व उभे रहाते. त्यानुसार त्यांनी पक्षात तिसरे बंड करून आता तिसर्यांदाही तलवार म्यान केली आणि कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींसमोर शरणागतीचे निशाण पडकवले. पण त्यांचा आव अजूनही तसा नाही. पक्षश्रेष्ठींनीच आपल्यासमोर नांगी टाकली आहे असा आव आणून ते आपण अजूनही कॉंग्रेसमध्येच राहणार आहोत आणि कॉंग्रेसचे कल्याणसाधणार आहोत असे भासवत आहेत.
नारायण नारायण
अर्थात लोक मूर्ख नाहीत. त्यांनी कसलाही आव आणला तरी लोकांना वस्तुस्थिती कळते. आपल्याला पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष होण्याची ऑफर दिली होती, कारण अन्य पक्षातले २० आमदार कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात होते असेही राणे यांनी ठोकून दिले. आजच्या काळात तरी या राज्यातला कोणी शहाणा आमदार कॉंग्रेसमध्ये येण्याचे धाडस करील असे संभवत नाही. पण पराभूत झालेले नारायण राणे काही तरी थापा मारून आपल्या पराभवाचे शल्य लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा सारा प्रयत्न, हा आविर्भाव, त्यांची निवेदने आणि त्यांची सारवासारवी हे सारे कमालीचे हास्यास्पद ठरलेले आहे. ते उद्योगमंत्री असले तरी आपल्या त्या पदाला शोभेल अशी विधाने करावीत एवढेही तारतम्य त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाराज होऊन त्यांनी बंडाचे निशाण पहिल्यांदा फडकावले आणि नेतृत्व बदलाची मागणी केली, तेव्हा आपण रागाच्या भरात काय बोललो याचेही भान त्यांना नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण कायम राहणार असतील तर महाराष्ट्रात कॉंग्रेसला २०-२५ जागा सुद्धा मिळण्याची शक्यता नाही असे त्यांनी म्हटले होते. मराठी माणसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तळपायाची आग लवकर मस्तकाला जाते आणि एक घाव दोन तुकडे या न्यायाने तो कटुतेपोटी पराकोटीची काही तरी नकारात्मक विधाने करून बसतो.
मराठी माणसाच्या या दुर्गुणाचा अर्क नारायण राणे यांच्यात उतरलेला आहे. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही असे त्यांना ज्या ज्या वेळी जाणवले त्यावेळी त्यांनी अशीच आततायीपणाची विधाने केलेली आहेत. ते कॉंग्रेसमध्ये रहायला तयार झाले आहेत, परंतु ज्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत २०-२५ सुद्धा जागा मिळण्याची शक्यता नाही त्या पक्षात आपण राहता कशाला, या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. कॉंग्रेसच्या या भवितव्याबद्दल आपण जी विधाने केली आहेत त्यावर अजूनही ठाम आहात का, याही प्रश्नावर त्यांना सारवासारवी शिवाय काहीही करता आले नाही. कॉंग्रेसला नेमक्या किती जागा मिळतील याचे भविष्य आपल्याला आताच सांगता येत नाही. या पक्षाचा दारूण पराभव होणार आहे हे मात्र दिसत आहे आणि नारायण राणे यांच्यासारखे अविचारी नेते वैयक्तिक स्वार्थापोटी अशा काही विचित्र कारवाया करत आहेत की, त्या कारवायांमुळेच या पक्षाला २०-२५ पेक्षा अधिक जागा मिळू नयेत असे वातावरण आपोआप तयार होत आहे. नारायण राणे २००५ साली शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हा आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठे केले होते हे विसरले.
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना पुढे करून त्यांच्या हाती शिवसेनेचे नेतृत्व सोपविण्याचा विचार सुरू केला तेव्हा नारायण राणे यांना इथे आता आपल्याला भवितव्य नाही याची जाणीव झाली. बाळासाहेबांचे पुत्रप्रेम त्यांना डाचायला लागले आणि त्या पुत्रप्रेमाचा धिक्कार करून त्यांनी शिवसेना सोडली. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये जाताना काही आमदारांना ते सोबत घेऊन गेले, परंतु ते आमदार आता त्यांच्यासोबत नाहीत. कारण नारायण राणे यांनी सुद्धा केवळ पुत्रप्रेमासाठीच डावपेच आखायला सुरुवात केली. मोठ्या बंडाचे निशाण फडकावून त्यांनी ते आपल्या मुलांच्या प्रेमासाठी म्हणून गुंडाळून ठेवले. ही तडजोड त्यांनी मुलांसाठी केली, पण तशी त्यांनी ती आपल्या सोबत कॉंग्रेसमध्ये आलेल्या कोणत्याही आमदारासाठी कधीच केली नाही. त्यामुळे आज त्यांच्यामागे त्यांची मुलेच राहिलेली आहेत. नेता म्हणून असलेली आपली बरीवाईट प्रतिमा राणे गमावून बसले आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:चे हसे करून घेतले आहे. आत्ममग्नवृत्ती आणि स्वत:च्या ताकदीविषयीचा फाजील विश्वास व्यापक राजकारण करण्याविषयीची असमर्थता, तोंडाळपणा आणि मुत्सद्दीपणाचा ठणठणाट इत्यादी दुर्गुणांमुळे त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यावर स्वत:च ‘सवालिया निशाण’ उभे केले आहे. आततायीपणा करून आपल्या स्वत:चे राजकीय भवितव्य बिघडवून घेणारा नारायण राणे यांच्यासारख्या आत्मघातकी नेता महाराष्ट्रात तरी कोणी नसेल.
