महाराष्ट्र सदनात सुरू करा हॉटेल किंवा लॉज : उद्धव ठाकरे

uddhav
नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनातील गैरकारभाराविरूद्ध शिवसेना खासदारांनी केलेल्या आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सुरू असल्याचा आरोप केला असून तेथे हॉटेल किंवा लॉज सुरू करा, अशी मागणीही केली आहे.

ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात मराठी खासदार तसेच मराठी माणसांना सोयीसुविधा मिळत नसतील तर या सदनाचा उपयोग कोणाला होतो, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सदन वादाचे तीव्र पडसाद देशभर उमटत असताना ठाकरे यांनी शिवसेना खासदारांच्या आंदोलनचे समर्थन केले आहे. शिवसेनेला लोकसभेत मिळालेल्या यशावर जळणारेच शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.