
फेसबुकवर युजर आपल्या ज्या भावभावना व्यक्त करतात त्याचा वापर फेसबुकने लोकांच्या भावनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या न कळत वापरल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर फेसबुकच्या या कृतीचा जगभरातून निषेध केला गेल्याची घटना ताजी आहे. यावर ९९ डेज ऑफ फ्रिडम अशी संज्ञा देऊन डच अॅड एजन्सीने नवीन अभियान सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्याला युजरचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे अशी अभियाने वेगाने फोफावत चालली असल्याचा अनुभवही येत आहे.
फेसबुक शिवाय ९९ दिवस रहा- अनुभव शेअर करा
जस्ट असे या एजन्सीचे नाव आहे. त्यांनी युजरना तुम्ही फेसबुकशिवाय किती दिवस काढू शकता असा प्रश्न केला आहे. त्यासाठी युजरने नोंदणी करून ३३ दिवस,६६ दिवस व ९९ दिवस अशा फेर्या त सहभागी व्हायचे आहे. प्रत्येक पिरीयड नंतर आपल्याला काय अनुभव आले हे सांगायचे आहे. त्यासाठी युजरने अभियानाचा लोगो डाऊनलोड करायचा आहे.
या अभियानाचा प्रणेता रेरियन स्ट्राथोफ म्हणतो, फेसबुकशी युजरचे नाते अतिशय जटील स्वरूपाचे आहे. कुणी फेसबुकमुळे आपल्या आयुष्यातील बराच काळ बरबादीत वाया गेल्याने दुःखी आहेत तर कांही कारण नसताना फोटो टॅग केल्यामुळे संत्रस्त आहेत. एकंदरीत फेसबुक युजरमध्ये नकारात्मक भावना अधिक प्रमाणात आहे. म्हणून हे अभियान सुरू केले आहे. फेसबुकच्या वापराशिवायचा काळ किती आनंदी होता हे युजरनी शेअर करायचे आहे. आत्ता पर्यंत १७ हजार लोक या अभियानात सामील झाले असून ही संख्या वेगाने वाढते आहे असा ही त्याचा दावा आहे.
