ओबामांच्या सुरात आली नरमाई

obama_8
वॉशिग्टन- भारताबरोबरच परदेशी प्रसारमाध्यमांनी भारतात सत्ता परिवर्तन नक्की असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरातही नरमाई आल्याचे दिसून आले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे भारतात भाजप आघाडीला सत्ता मिळण्याचे संकेत दिले गेले आहेत. याचाच अर्थ नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर असणार आहेत. हा बदल अमेरिकेने मान्य केला असून भविष्यातील सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ओबामा यांनी भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. द टेलिग्राफ वृत्तपत्राने अमेरिकेचा भारताबाबतचा व त्यातही नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा सूर बदलल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कारण अमेरिकेने २००२ च्या गुजराथ दंगलीबाबत मोदी यांना नेहमीच आरोपी मानले होते. आता मात्र भारत अमेरिकेची गेल्या दोन दशकांची मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिका उत्सुक असल्याचे ओबामा यांनी जाहीर केले आहे.

ओबामांच्या या घोषणेचे भाजप नेते तरूण विजय यांनी स्वागत केले असून आम्हीही अमेरिकेबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.