IND vs AUS : 2 षटकार आणि रचला इतिहास, असा विक्रम 77 वर्षात झाला प्रथमच


17 डिसेंबर 2024 रोजी टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी कसोटी क्रिकेटमध्ये केलेला पराक्रम दीर्घकाळ स्मरणात राहील. टीम इंडियाच्या या 10व्या आणि 11व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शेवटच्या विकेटसाठी शानदार खेळ केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारही ठोकले. यासह, कसोटीत प्रथमच 10व्या आणि 11व्या क्रमांकावरील भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकार ठोकले. 77 वर्षांच्या इतिहासात हा पराक्रम पहिल्यांदाच घडला आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिली कसोटी मालिका 1947 मध्ये झाली होती. पण तेव्हापासून आजतागायत असे कधीच घडले नव्हते.

गब्बा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात आकाश आणि बुमराहने टीम इंडियाच्या शेवटच्या विकेटसाठी नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान दोघांनीही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सविरुद्ध प्रत्येकी एक षटकार ठोकला. बुमराह आणि आकाश या दोघांचे हे षटकार पाहण्यासारखे होते, ज्याने चाहत्यांसह भारतीय छावणीतही उत्साह संचारला होता.


आकाश दीप आणि बुमराहच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीने 77 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी कामगिरी केली नाही, तर या दोघांच्या अंगदसारख्या खंबीरपणे उभे राहण्याचा फायदाही टीम इंडियाला मिळाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 विकेट गमावून 252 धावा केल्या आहेत.


आकाश दीप 31 चेंडूत 27 धावा आणि बुमराह 27 चेंडूत 10 धावा करत नाबाद आहे. टीम इंडियाची नववी विकेट पडली, तेव्हा फॉलोऑन टाळण्यासाठी 32 धावांची गरज होती. या कठीण काळात बुमराह आणि आकाशने संयमाने फलंदाजी केली. दोघांनी फॉलोऑनचा धोका टाळला आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ही जोडी नाबाद राहिली.

फलंदाजीपूर्वी जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने गोलंदाजीतही योगदान दिले. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात 28 षटकात 76 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. त्याने 29.5 षटकात 95 धावा दिल्या.