VIDEO : एकाच षटकात स्टेडियमची दोनदा बत्ती गुल, त्यानंतर चाहत्यांनी केले असे काही


ॲडलेड ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियमचे दिवे अचानक गेले. त्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागला आणि काही काळ खेळ थांबवण्यात आला. लाईट आल्यावर काही सेकंदांनी ती पुन्हा बंद झाली. यामुळे केवळ भारतीय खेळाडूच नाही, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूही नाराज झाले होते. मात्र, काही वेळातच फ्लड लाइट येऊ लागली आणि पुन्हा खेळ सुरू झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या या डे-नाईट सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टेडियममधील फ्लड लाइट्स काही काळासाठी अडथळा ठरले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात हर्षित राणा गोलंदाजी करत असताना अचानक स्टेडियमचे फ्लड लाइट बंद झाली. खेळात व्यत्यय आला. मग दिवे लागले, पण पुन्हा एकदा फ्लड लाईट गेली. ही घटना दुसऱ्या डावातील 18 व्या षटकात घडली. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश लाईट ऑन केले.


ॲडलेड कसोटी गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाची ही 13 वी आणि भारताची पाचवी गुलाबी चेंडूची कसोटी आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने केवळ 180 धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी, आपली दुसरी कसोटी खेळत असताना, भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा होता. त्याने 54 चेंडूत 42 धावा केल्या. या आक्रमक खेळीत रेड्डीने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 50 धावांत सर्वाधिक 6 बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

भारताला 180 धावांत गुंडाळल्यानंतर कांगारू संघ आपल्या पहिल्या डावात अतिशय मजबूत स्थितीत पोहोचला आहे. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 33 षटकात 86 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजाच्या रूपाने ऑस्ट्रेलियाने एकमेव विकेट गमावली. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. सध्या, नॅथन मॅकस्विनी 38 धावा करून क्रीजवर आहे आणि लॅबुशेन 20 धावा करून क्रीजवर आहे.