
पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा डिलुमिनाटी इंडिया टूर सुरू झाला आहे. या दौऱ्याचे पहिले कॉन्सर्ट 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. आपल्या आवडत्या गायकाला ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते. लोकांनी दिलजीतच्या कॉन्सर्टचा खूप आनंद घेतला असला, तरी ज्या ठिकाणी कॉन्सर्ट झाली त्या ठिकाणामुळे तिथल्या लोकांसाठी खूप समस्या निर्माण झाल्या आहेत.
Diljit Dosanjh Dil-Luminati Tour : सडलेले अन्न, दारूच्या बाटल्या… दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर अशी झाली स्टेडियमची अवस्था
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दिलजीतच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते, जेव्हा सर्व काही संपले होते, दुसऱ्या दिवशी काही खेळाडू त्यांच्या खेळाचा सराव करण्यासाठी आले आणि स्टेडियमची खराब स्थिती पाहून ते खूपच निराश झाले. वास्तविक, ॲथलीट बेअंत सिंगने दिलजीतचा कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेडियमचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सडलेले अन्न आणि बरीच घाण दिसत होती.
शोनंतर जवाहरलाल नेहरू स्टेडियमची अवस्था अत्यंत वाईट दिसली. रनिंग ट्रॅकवर सर्वत्र दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या. एवढेच नाही तर लोकांनी स्टेडियमच्या खुर्च्याही फोडल्या. स्टेडियमच्या या दुरावस्थेमुळे अनेक खेळाडूंना सराव सोडावा लागला. या परिस्थितीबाबत अनेक खेळाडूंनी नाराजीही व्यक्त केली आहे.
मात्र, या कॉन्सर्टबाबत क्रीडा प्राधिकरण आणि सारेगामा यांच्यात करार झाला असून, त्यात हे स्टेडियम 1 नोव्हेंबरपर्यंत भाड्याने देण्यात आले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत स्टेडियमची स्वच्छता करण्यात येणार असून त्यानंतर हे स्टेडियम क्रीडा प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सध्या या स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारचे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार नाहीत.
