हरमनप्रीत कौरला हटवण्याच्या तयारीत बीसीसीआय? समोर आली टीम इंडियाच्या पराभवासह 5 मोठी कारणे


महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. ही स्पर्धा जिंकण्याची टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात होती. पण भारतीय संघ बाद फेरीतही पोहोचू शकला नाही आणि ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. आता हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ताज्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार याच्यासोबत बैठक घेऊन हरमनप्रीतला कर्णधारपदावरून हटवू शकते. याशिवाय टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राज हिनेही गेल्या 2 ते 3 वर्षात संघात कोणतीही प्रगती झाली नसल्याची टीका केली आहे. तिने देखील नवीन कर्णधाराची मागणीही केली आहे.

भारतीय महिला संघाला 24 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, याआधी बीसीसीआय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्यासोबत बैठक घेऊ शकते. यादरम्यान हरमनप्रीतच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी, बीसीसीआय आता तिला हटवून नवीन कर्णधार आणू इच्छित आहे.

2016 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाला स्थान मिळवता आले नाही. यानंतर हरमनप्रीत कौरला टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले. तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बाद फेरीपर्यंत मजल मारली. 2020 च्या आवृत्तीत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, ती स्पर्धा जिंकण्यात कधीही यशस्वी ठरली नाही.

हरमनप्रीत कौरला कर्णधारपदावरून हटवण्यामागे काही कारणे समोर आली आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे यावेळी भारतीय संघ बलाढय़ असूनही उपांत्य फेरी गाठू शकला नाही. त्याचबरोबर हा संघ टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण आधी न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फिटनेस आणि क्षेत्ररक्षण ही देखील मोठी समस्या आहे. T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 झेल सोडले. काही संधी होत्या ज्यांचे कॅचमध्ये रूपांतर करता आले असते.

संघाची माजी कर्णधार मिताली राजनेही संघाच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 11 पैकी केवळ 2 फिट खेळाडूंच्या जोरावर मोठी स्पर्धा जिंकता येत नाही, असे तिने म्हटले आहे. तिच्या मते, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांच्याशिवाय इतर खेळाडू मैदानावर वेगवान नाहीत. हरमनप्रीतच्या कार्यकाळात नवीन खेळाडूंना संधी न दिल्यानेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मितालीच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत संघात कोणतीही प्रगती झालेली नाही. केवळ जुने खेळाडू सतत खेळत आहेत.

पुरुष संघाचे उदाहरण देताना मिताली म्हणाली की, प्रत्येक मोठ्या स्पर्धेनंतर नवीन खेळाडूंना संधी दिल्याने ते अधिक यशस्वी होतात. तर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली नवीन खेळाडू तयार होऊ शकलेले नाहीत. त्याचबरोबर मोठ्या स्पर्धांपूर्वी संघ व्यवस्थापनाचे नियोजनही चांगले राहिलेले नाही. यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया चषक तयारी ही एक मोठी संधी होती. पण भारतीय संघ ती स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळत राहिला. यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू झाली, तेव्हा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.