
वरुण धवनची पुतणी अंजिनी धवनने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिचा ‘बिन्नी अँड फॅमिली’ हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पंकज कपूरही दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. अंजिनीचा चित्रपट चालला नसेल, पण आता तिचे नशीब चमकणार असल्याचे दिसत आहे. अंजिनीला सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात एंट्री मिळाली आहे.
Sikandar : वरुण धवनच्या पुतणीला सलमान खानचा आसरा, ‘सिकंदर’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
मिड डेने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सलमानच्या चित्रपटात अंजिनी धवनला भूमिका देण्यात आली आहे. सूत्राने सांगितले की, “तिला चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. या पात्रासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि त्यात अंजिनी एकदम फिट बसते. ती लवकरच शूट सुरू करणार आहे.”
रिपोर्टमध्ये आणखी एका सूत्राचा हवाला देत असे म्हटले आहे की, अंजिनी धवन या चित्रपटात कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार आहे आणि सलमान खानसोबत तिच्या पात्राचे नाते काय असेल हे अद्याप कळलेले नाही. मात्र, अंजिनी हा चित्रपटातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, हे नक्की. त्यामुळे निर्मात्यांना तिचे पात्र लपवायचे आहे.
‘सिकंदर’मध्ये सलमान खानशिवाय रश्मिका मंदान्ना, सुनील शेट्टी, सत्यराज आणि काजल अग्रवाल हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास करत आहेत. या वर्षी जूनमध्ये सलमान खानने मुंबईत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, ‘3 इडियट्स’ फेम शर्मन जोशीनेही सलमानच्या या चित्रपटात प्रवेश केला आहे.
या चित्रपटात सलमान खानने भावनिक भूतकाळ असलेल्या व्यावसायिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सलमान भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
