फोन विकण्यापूर्वी तुम्ही करणार आहात का फॉरमॅट ? त्याआधी बॅकअपपासून सुरक्षिततेपर्यंत नक्कीच पूर्ण करा हे काम


तुमचा जुना फोन एक्स्चेंज करण्यापूर्वी किंवा दुसऱ्याला देण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे नीट पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. फक्त तुमचा फोन आणि वैयक्तिक डेटा दुसऱ्याला सोपवणे धोकादायक ठरू शकते. अशावेळी फोनचा बॅकअप घेणे आणि त्याचा डेटा योग्य प्रकारे हाताळणे खूप महत्त्वाचे असते. तसेच, फोन फॉरमॅट केल्यानंतरच तो दुसऱ्याच्या ताब्यात द्यावा.

तुम्ही तुमचा फोन विकण्यापूर्वी फॉरमॅट करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुमचा कोणताही संवेदनशील तपशील फोनच्या नवीन मालकाकडे जाऊ नये. येथे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत…

डेटाचा बॅकअप घ्या
फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट आणि इतर फाईल्स यासारख्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही Google Drive, iCloud किंवा इतर क्लाउड सेवा वापरू शकता. बॅकअप घेतल्यानंतर, तुम्ही ते तुमच्या काँप्युटरवर किंवा इतर डिव्हाइसवर देखील स्टोअर करू शकता.

सर्व खात्यांमधून लॉग आउट करा
तुमच्या सर्व सोशल मीडिया, ईमेल, बँकिंग आणि इतर ॲप्समधून लॉग आउट करा. तसेच, फोनवरून तुमचे Google, Apple किंवा इतर आयडी काढून टाका. याशिवाय Find My Device सारखे ट्रॅकिंग फीचर्स बंद करायला विसरू नका.

फॅक्टरी रीसेट
फोन फॉरमॅट करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि फॅक्टरी रीसेट किंवा फोन रीसेट करा हा पर्याय निवडा. याच्या मदतीने तुमचा फोन डेटा पूर्णपणे साफ होईल. फॉरमॅट केल्यानंतर फोनमध्ये कोणताही वैयक्तिक डेटा शिल्लक नाही याची खात्री करा.

सिम आणि मेमरी कार्ड काढा
फोनमधून तुमचे सिम कार्ड आणि कोणत्याही प्रकारचे मेमरी कार्ड काढून टाका. तुमचा वैयक्तिक डेटा कार्डमध्ये संग्रहित केला जाऊ शकतो, म्हणून तो हटवणे महत्त्वाचे आहे.

IMEI नंबरची नोंद ठेवा
फोन विकण्यापूर्वी IMEI नंबरची नोंद करा. तुम्हाला नंतर काही समस्या आल्यास, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

फोनची फिजिकल स्थिती
फोन साफ करा आणि चार्जर, केबल आणि बॉक्स यासारख्या सर्व सामान तयार ठेवा. असे केल्याने तुम्हाला फोनची चांगली किंमत मिळू शकते.

लक्षात ठेवा की तुम्ही वर नमूद केलेल्या गोष्टींबाबत निष्काळजी राहिल्यास तुमचा डेटा आणि बँक तपशीलांचा गैरवापर होऊ शकतो.