जो रूटशी पंगा घेणे पडले होते महागात, 12व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कसोटीपटू झाला निवृत्त


वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गॅब्रिएलने बुधवारी 28 ऑगस्ट रोजी उशिरा आपला निर्णय जाहीर केला. यासह त्याने आपल्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केला. त्याने सोशल मीडियावर निवृत्तीची माहिती दिली. गॅब्रिएलने त्याच्या चमकदार कारकिर्दीसाठी त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षकांसह त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली ज्यामध्ये त्याने म्हटले की उच्च स्तरावर खेळ खेळल्याने त्याला खूप आनंद मिळला, परंतु प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो. वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाचाही एक विचित्र विक्रम त्याच्या नावावर आहे. सामान्यतः क्रिकेटमध्ये 11व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असते, परंतु गॅब्रिएल हा जगातील पहिला कसोटी क्रिकेटर आहे, जो 12व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा.

2019 मध्ये इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान एका कसोटी सामन्यादरम्यान शॅनन गॅब्रिएल अडचणीत सापडला होता. सामन्यादरम्यान त्याने काही आक्षेपार्ह शब्द वापरले होते, जे त्याला चांगलेच महागात पडले. वास्तविक, सेंट लुसिया येथे झालेल्या या सामन्यात जो रूटने शानदार फलंदाजी केली. त्याला आऊट करणे अवघड होते. तेव्हा गॅब्रिएल त्याला स्लेज करत म्हणाला, “तू इतका का हसतोस, तुला मुले आवडतात का?”

गॅब्रिएल इथेच थांबला नाही, तो पुढे म्हणाला, “यात बदनामीकारक काहीही नाही. समलिंगी असण्यात काहीच गैर नाही.” त्याची स्लेडिंग स्टंप माइकमध्ये कैद झाली, त्यानंतर आयसीसीने कारवाई करत त्याच्यावर 4 सामन्यांची बंदी घातली. नंतर ग्रेबिएलने आपली चूक मान्य केली आणि माफीही मागितली. या कसोटी सामन्यात रुटने दुसऱ्या डावात शतक झळकावले होते आणि वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला होता.

शॅनन गॅब्रिएलने आपल्या कारकिर्दीत 86 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्याने 202 विकेट घेतल्या. त्याने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 2013 मध्ये त्याने टी-20 आणि 2016 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गॅब्रिएलने 59 कसोटी सामन्यात 122 विकेट्स, 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 बळी आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 विकेट घेतल्या आहेत.