
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी सकाळी, त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आणि सर्व चाहत्यांचे आभार मानले. क्रिकेटला अलविदा करताना त्याने खासकरून त्याचे कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, टीम इंडिया आणि बीसीसीआयचे आभार मानले. धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे खेळला होता. या सामन्यात त्याला केवळ 3 धावा करता आल्या.
शिखर धवनच्या शानदार कारकीर्दीचा शेवट, क्रिकेटला केला अलविदा
शिखर धवनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या सामन्याची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर तो एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर, 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. धवनने आपल्या कसोटी पदार्पणात 187 धावांची शानदार खेळी केली. मात्र, 14 वर्षांनंतर त्याने आता आपला क्रिकेट प्रवास संपवला आहे. निवृत्ती घेताना धवन म्हणाला की तो शांत आहे. निवृत्ती घेताना त्याला कशाचीही खंत नाही, कारण तो देशासाठी खूप खेळला आहे.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
भारताकडून खेळताना धवनची कारकीर्द अतिशय चमकदार होती. त्याने टीम इंडियासाठी एकापेक्षा एक खेळी खेळल्या. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला. धवनने भारतासाठी एकूण 269 सामने खेळले, ज्यात त्याने 10867 धावा केल्या.
धवनने कसोटीत 34 सामने खेळले असून 58 डावात 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.11 च्या सरासरीने 6793 धावा आणि 68 टी20 सामन्यात 1759 धावा केल्या. धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. त्याने कसोटीत 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. धवनने T20 मध्ये 11 अर्धशतकेही झळकावली आहेत.
