40 लाखांना विकली गेली जर्सी, ग्लोव्हज 28 लाखांना, केएल राहुलच्या लिलावात विराट कोहलीचा धमाका, रोहित-धोनी राहिले मागे


भारतीय विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी नुकताच गरजू मुलांसाठी लिलाव आयोजित केला होता. राहुलला अनेक क्रिकेटपटूंकडून स्वाक्षरी केलेल्या क्रीडा वस्तू मिळाल्या होत्या, ज्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विप्ला फाउंडेशनसाठी आयोजित ‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ नावाच्या या लिलावात विराट कोहलीच्या गोष्टींबाबत खळबळ उडाली होती. त्याची जर्सी आणि ग्लोव्हज मिळविण्यासाठी लिलावात शर्यत लागली होती. विराटच्या जर्सीसमोर रोहित शर्मा आणि एमएम धोनीची बॅट फिकी पडली. या वेळी विराट कोहलीच्या जर्सीने लिलावात धुमाकूळ घातला. कोहलीने राहुलला स्वाक्षरी असलेली वर्ल्ड कप जर्सी दिली होती, जी 40 लाख रुपयांना विकली गेली. त्याच्या ग्लोव्हजसाठी त्याला 28 लाख रुपये मिळाले. या लिलावातून राहुलने एकूण 1.93 कोटी रुपये जमा केले.

भारतात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. विराट-रोहितसारख्या दिग्गजांना भेटण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यांच्या गोष्टी मिळाल्या, तर चाहत्यांसाठी ते स्वप्नापेक्षा कमी नसते. त्यामुळे केएल राहुलच्या लिलावात या महान क्रिकेटपटूंच्या गोष्टींवर बरीच बोली लागली होती. मात्र, दरवेळप्रमाणे या वेळीही विराटने बाजी मारली. रोहित आणि धोनीच्या दोन बॅटही विराटच्या जर्सीला टक्कर देऊ शकल्या नाहीत. रोहितची बॅट 24 लाखांना विकली गेली, तर धोनीची बॅट 13 लाखांना विकली गेली. या दोघांनी मिळून एकूण 37 लाख रुपये कमावले, जे विराटच्या जर्सीच्या किंमतीपेक्षा 3 लाख रुपये कमी होते.


विराट कोहलीची जर्सी आणि ग्लोव्हज, रोहित आणि धोनीच्या बॅटनंतर राहुल द्रविडच्या बॅटला किंमत मिळाली, ज्याची किंमत 11 लाख रुपये होती. तर केएल राहुलची टीम इंडियाची टेस्ट जर्सीची किंमत 11 लाख रुपये होती. त्याच्या वर्ल्ड कप बॅटची किंमत 7 लाख रुपये होती. याशिवाय जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड कप जर्सीला 8 लाख रुपये आणि ऋषभ पंतच्या आयपीएल बॅटला 7 लाख रुपये मिळाले आहेत.

केएल राहुलच्या लिलावात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरनच्या आयपीएल जर्सीला सर्वात कमी किंमत मिळाली आहे. यासाठी केवळ 45 हजार रुपयांची बोली लागली. याशिवाय युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांची आयपीएल जर्सी प्रत्येकी 50 हजार रुपयांना, तर जोस बटलरची आयपीएल जर्सी 55 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली.