सचिनसोबत खेळणाऱ्या या क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या संघाचा तो झाला प्रशिक्षक


केनिया संघाने आपल्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. केनिया क्रिकेट बोर्डाने 90 च्या दशकात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत खेळणारा भारतीय गोलंदाज दोड्डा गणेश याची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. केनियाच्या संघाने 4 एकदिवसीय विश्वचषक आणि 1 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र 2011 पासून तो एकही विश्वचषक खेळलेला नाही. प्रशिक्षक बनताच गणेशने केनियन संघाला यामध्ये पात्र बनवण्याचे आपले ध्येय बनवले. क्रिकेट केनियाने (सीके) त्याच्यासोबत एक वर्षाचा करार केला आहे. त्याने संघाला चांगली कामगिरी करण्यास मदत केली, तर ती वाढवता येणार आहे.

माजी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज दोड्डा गणेशला क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. 1994-95 च्या मोसमात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 1997 मध्ये भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गणेशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तितकीशी चांगली नव्हती. तो फक्त 4 कसोटी आणि 1 वनडे खेळू शकला. या काळात व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथसारखे वेगवान गोलंदाज संघात होते. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारखे महान फलंदाजही त्याचे सहकारी होते. दोड्डा गणेशने फर्स्ट क्लासमध्ये 104 मॅचमध्ये 365 विकेट्स घेतल्या आहेत आणि लिस्ट ए मध्ये 89 मॅचमध्ये 128 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच त्याने कारकिर्दीत एकूण 493 विकेट घेतल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणारा गणेश 2007 मध्ये निवृत्त झाला.


केनिया हा एकेकाळी आफ्रिकेतील बलाढ्य संघांपैकी एक होता. तो सतत विश्वचषकासाठी पात्र ठरत असे. 1996, 1999, 2003 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषकाव्यतिरिक्त, या संघाने 2007 टी-20 मध्येही भाग घेतला होता. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकात हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. यानंतर कामगिरीत सातत्याने घसरण होत गेली आणि गेल्या 13 वर्षांत त्याला एकाही मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.

दोड्डा गणेश संघाचे मुख्य प्रशिक्षक होताच त्याने सांगितले की, त्याच्याकडे एकच दृष्टी आहे आणि ती म्हणजे या संघाला जागतिक पातळीवर नेण्याचे. गणेश 10 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसी विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये संघाची धुरा सांभाळणार आहे. ही लीग नैरोबी येथे खेळवली जाईल, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी, डेन्मार्क, कुवेत, जर्सी आणि कतारचे संघ सहभागी होणार आहेत.