
भारतीय क्रिकेट संघाला गौतम गंभीरच्या रूपाने नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे, जो श्रीलंका मालिकेपासून संघाची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये कोणकोणत्या चेहऱ्यांचा समावेश असेल याची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र गंभीरसोबत काम करताना दिसणाऱ्या दिग्गजांची नावे समोर आली आहेत. राहुल द्रविडच्या सपोर्टिंग स्टाफचा एक सदस्यही नवीन स्टाफचा भाग असेल.
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफ झाला पूर्ण, गौतम गंभीरची मागणी पूर्ण! हे दिग्गज करतील एकत्र काम
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि नेदरलँडचा माजी क्रिकेटपटू रायन टेन ड्यूश हे भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग असतील. याशिवाय मॉर्नी मॉर्केललाही सपोर्टिंग स्टाफमध्ये स्थान मिळाले आहे. त्याचवेळी टी दिलीप संघासोबत राहणार असून क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे. यापूर्वी, टी दिलीप देखील राहुल द्रविडच्या सपोर्टिंग स्टाफचा एक भाग होता. अलीकडच्या काळात टी दिलीपच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणात बरीच सुधारणा झाली आहे, त्यामुळे बीसीसीआय त्याला स्टाफमध्ये कायम ठेवणार आहे.
नायर आणि टेन ड्यूश या दोघांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल गंभीरच्या प्रशिक्षक संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. या तिन्ही दिग्गजांनी यापूर्वी गौतम गंभीरसोबत काम केले आहे. IPL 2024 मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्ससाठी अभिषेक नायर आणि रायन टेन ड्यूशसोबत काम केले. अभिषेक नायर आणि रायन टेन ड्यूश यानीही संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, गंभीर आणि मॉर्केल यांनीही आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी काम केले आहे.
रिपोर्टनुसार, टी दिलीप आणि अभिषेक नायर संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. पण टेन ड्यूश आणि मॉर्केल संघात कधी सामील होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. टेन ड्यूश सध्या मेजर लीग क्रिकेट (MLC) मधील LA नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे आणि तो यूएस मध्ये आहे. अशा परिस्थितीत तो थेट कोलंबोच्या संघात सामील होऊ शकतो.
