Gurucharan Singh Missing Case : 10 बँक खाती, एकापेक्षा जास्त ईमेल, गुरचरण सिंग प्रकरणात पोलिसांचा खुलासा


22 एप्रिल 2024 पासून बेपत्ता असलेला गुरचरण सिंह अद्याप सापडलेला नाही. 18 दिवसांपूर्वी तो मुंबईला जाण्यासाठी दिल्लीतील घरातून निघाला होता. पण गुरुचरण त्या फ्लाइटमध्ये बसलाच नाही. आता या प्रकरणी पोलिसांना काही नवीन पुरावे मिळाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण एकाच वेळी 10 बँक खाती मॅनेज करत होता. तसेच, त्याच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट झाले आहे की, काही काळापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरणने धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्याने ठरवले होते की आपल्याला डोंगरात जाऊन राहायचे आहे.

गुरुचरण सिंह याची अनेक ईमेल खाती असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे आणि त्याने आपली 10 बँक खाती या वेगवेगळ्या खात्यांशी जोडली होती. आर्थिक अडचणी असतानाही त्याने ही बँक खाती व्यवस्थित सांभाळली होती. जवळचे मित्र आणि डिजिटल तपासादरम्यान पोलिसांना गुरुचरणचा धर्माकडे कल वाढत असल्याची माहितीही मिळाली. तो धर्माशी निगडीत कामात रस घेऊ लागला होता. सर्व काही सोडून डोंगरात राहायला जाण्याबद्दल तो त्याच्या एका खास मित्राशी बोलला होता.


26 एप्रिल रोजी अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. गुरुचरण बेपत्ता झाल्याची माहिती त्याचे वडील हरजीत सिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिली होती. गुरुचरणच्या वडिलांचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीत होता. यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. गुरुचरणचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील या अभिनेत्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.